वर्धा : अजितदादा पवार जिल्ह्यात सर्वाधिक कुणाच्या घरी भेटीस आले असतील तर सहकार नेते व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांच्याकडे. या गटाचा कुठलाही राजकीय किंवा संस्थेचा कार्यक्रम असला तर दादांचे जेवण देशमुख यांच्याकडे ठरलेले. त्यामुळे या कुटुंबाच्या दादांशी अनेक आठवणी जुळलेल्या. त्यापैकीच ही एक, दादांच्या सहज वागण्याची.
डिसेंबर २०१० मध्ये दादा उपमुख्यमंत्री असतांना वर्धा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते प्रथम सेवाग्राम आश्रमत अभिवादन करण्यास पोहचले. समीर देशमुख हेच त्यांच्या सोबत होते. तिथून कार्यक्रमासाठी परत निघतांना ते देशमुख यांना म्हणाले की तुझी गाडी कुठाय. चल तुझ्याच गाडीत येतो. देशमुख यांनी ड्राइव्हरला थांबायला सांगत गाडीचे स्टेयरिंग हाती घेतले. लगेच एक पोलीस उपनिरीक्षक जवळ आले आणि म्हणाले की दादा गाडी चेक नाही केली. थोडे थांबाल. तेव्हा मंद स्मित करीत दादा म्हणाले असू दे. देशमुख यांच्या पाठीवर थोपटत म्हणाले कोणती रे ही गाडी. पजेरो, असे उत्तर येताच दादा सांगू लागले की अरे ही गाडी तर साहेबांपाशी पण होती. मला आवडली म्हणून मग मी पण घेतली होती. अशी आठवण सांगत समीर देशमुख म्हणतात की वाटेत दादांनी सर्व ती विचारपूस केली. सहकारी संस्था, शिक्षण संस्था, कुटुंब याविषयी ते भरभरून बोलले.
एकदा प्रा. देशमुख आमदार झाले असतांना यशवंत महाविद्यालयात दादांचा कार्यक्रम होता. तेव्हा उपस्थित सहकार कार्यकर्त्यांनी दादा, लाल दिवा द्या. दादांनी आपल्या भाषणात तो संदर्भ देत घोषणा केली की चला तर, दिली समजा जिल्ह्यास लाल दिव्याची गाडी. पुढे आमदार देशमुख यांना लवकरच विदर्भ पाटबंधारे मंडळाचे उपाध्यक्षपद देत दादांनी घोषनेची पूर्तता पण करून टाकली.
प्रा. सुरेश देशमुख सांगतात की आमच्या एका सहकारी संस्थेचे एक काम अडले होते. तेव्हा मी दादांकडे गेलो. म्हटले की भुजबळ साहेबांकडे हे काम आहे. तडकन आपले दालन सोडत ते मला घेऊन भुजबळ यांच्या दालनात पोहचले. फाईल ठेवली. भुजबळ यांची लगेच स्वाक्षरी उमटली. काम चटकन मार्गी लावण्याची दादांचे कसब मी अनेकवेळा अनुभवले. ते वर्धा जिल्ह्यात आले की आमच्या घरी भेट देतच असत. दिल खुलास गप्पा व मिश्किल चिमटे काढत ते वातावरण मोकळे करून टाकत. त्यांच्या असंख्य आठवणी आहेत. असा स्नेही मिळणे नाही.

