अमरावती : अमरावती महापालिकेवर युवा स्वाभिमान आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सहकार्याने भाजपची सत्ता स्थापन होईल, हे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीविना भाजपचा महापौर होईल, असा दावा युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी केला होता, त्याआधी रवी राणा भाजपसोबत असतील, तर राष्ट्रवादी सत्तेत नसेल, अशी अट आमदार संजय खोडके यांनी घातल्याने काही काळासाठी पेच निर्माण झाला होता, पण यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली होती. २७ जानेवारीला चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. पण, खोडके यांच्याशी संवाद होण्याआधीच २८ जानेवारीला विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. नंतरच्या घडामोडींमध्ये काल थेट मुख्यमंत्र्यांनी संजय खोडके यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि भाजपला सहकार्य करण्याची विनंती केली. संजय खोडके यांनी देखील महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी सहकार्य करण्याचे वचन दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके यांची भूमिका सत्तास्थापनेत महत्वाची ठरली आहे. संजय खोडके यांनी संपूर्ण घटनाक्रम विषद केला. ते म्हणाले, रवी राणा जर सत्तेत सहभागी होत असतील, तर राष्ट्रवादी भाजपसोबत नसेल, अशी भूमिका आपण घेतली होती, पण त्यानंतर आपण वरिष्ठ जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य असेल, असेही आपण स्पष्ट केले होते. कारण अजित पवार यांनी स्वत: आपल्याला थांबण्यास सांगितले होते. अमरावतीच्या महापौरपदासंदर्भात अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली होती. नंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अजित पवार यांना भेटण्यासाठी मुंबईतील देवगिरी या निवासस्थानी मंगळवारी रात्री गेले होते. त्यांच्यात विस्तृत चर्चा झाली. आपण बुधवारी अजित पवार यांच्याशी संपर्क साधणार होतो, पण त्याआधीच त्यांच्या निधनाची धक्कादायक वार्ता आली.

संजय खोडके म्हणाले, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट झाली. त्यावेळी अमरावतीच्या बाबतीत नंतर चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. महापौरपदाच्या निवडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपचे आमदार संजय कुटे हे स्वत: माझ्याकडे आले. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांशी आपण संवाद साधला. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली. त्यामुळे आपण भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आम्ही विकासाच्या मुद्यावर भाजपसोबत आहोत. स्थायी समिती किंवा इतर पदांच्या संदर्भात पुढील काळात चर्चा करून निर्णय घेतला जाईल, त्याला अजून वेळ आहे.