नागपूर : स्पष्टवक्तेपणा ही ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांची ओळख, तर राजकारणात थेट बोलण्याची शैली हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैशिष्ट्य. विचारधारेची, कार्यक्षेत्राची आणि वाटचालीची दिशा भिन्न असली, तरी मोकळेपणा आणि प्रांजळपणा हा समान धागा नागपुरातील त्यांच्या भेटीत प्रकर्षाने जाणवला. साहित्य आणि राजकारण ही दोन्ही वेगळी विश्वे, पण नागपुरात या दोन्ही विश्वाचा संगम झाला. अवघ्या १५ मिनिटांसाठी ठरलेली ही भेट दोन तासांपर्यंत रंगली.
सात-आठ वर्षांपूर्वीचा हा किस्सा एलकुंचवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितला. नागपुरातील लेखकांशी संवाद साधण्याची इच्छा अजित पवारांनी व्यक्त केली होती. ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार आणि ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांना ते भेटणार होते. कोणतेही राजकीय निमित्त नव्हते, औपचारिक अजेंडा नव्हता. त्यानुसार शंकरनगरातील एलकुंचवार यांच्या निवासस्थानी अजितदादा पोहचले.
भेटीच्या पहिल्याच क्षणी अजित पवारांनी त्यांच्या स्वभावाला साजेल अशा थेटपणाने कबुली दिली. ‘मला तुमच्याबद्दल फारशी माहिती नव्हती.’ राजकारणातील गणिते बाजूला ठेवून केलेली ही प्रामाणिक सुरुवात संवादाची दिशा ठरवणारी ठरली. औपचारिक भेट क्षणातच संवादात बदलली. साहित्य, समाज, वैचारिक भूमिका आणि राजकारण अशा विषयांवर मुक्तपणे चर्चा रंगली. वेळेचे भान सुटले आणि पंधरा मिनिटांची मर्यादा केव्हाच मागे पडली. चर्चा संपत असतानाच एलकुंचवारांनीही तितक्याच प्रांजळपणे भूमिका मांडली. ‘तुम्हाला माझ्याविषयी फार माहिती नाही, पण मलाही राजकारणाशी फार देणेघेणे नाही.’ हा प्रतिसाद केवळ विनोद नव्हता, तर दोघांच्या स्पष्टवक्तेपणाचे प्रतीक होता.
महेश एलकुंचवार हे जरा अतीच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांच्याकडे मुलाखतीसाठी जाणाऱ्या व्यक्तीसाठी त्यांचा पहिला प्रश्न हाच असतो, “तुम्ही माझं साहित्य वाचलं आहे का?” त्यामुळे पत्रकार मंडळी त्यांच्याकडे फिरकायला टाळतात. पण त्याच एलकुंचवारांची दुसरी बाजूदेखील आहे. त्यांचे का एखाद्याशी जमले तर तासनतास गप्पांचा फड रंगतो. अजित पवार ही स्पष्टवक्ते, त्यामुळे त्यांनीही एलकुंचवारांना भेटताक्षणीच सांगुन टाकले, “मला तुमच्याविषयी माहिती नाही” आणि अशा ही दोन व्यक्तिमत्त्व एकत्र आली आणि त्यांच्या गप्पांचा फड रंगतच गेला. साहित्यिक आणि राजकारणी अशा दोन भिन्न विश्वांतील ही भेट कोणत्याही निर्णयासाठी नव्हती, तर संवादासाठी होती. शब्दांवर पकड असलेल्या दोन व्यक्तिमत्त्वांमधील हा संवाद म्हणूनच संस्मरणीय ठरला.

