नागपूरः लोकनेते अजित पवार यांच्या अस्थींचे मंगळवारी कुही तालुक्यातील अंभोरा येथील वैनगंगा, कन्हान आणि जाम नद्यांच्या त्रिवेणी संगमावर शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात आले. ‘अजितदादा अमर रहे’ च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरिकांनी डोळ्यांत अश्रू आणि मनात कृतज्ञतेची भावना घेऊन आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

नागपूरातील गणेशपेठ येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) कार्यालयापासून दुपारी सुमारे दोनच्या सुमारास अस्थी विसर्जन यात्रेला सुरुवात झाली. शेकडो वाहनांचा ताफा आणि हजारो समर्थक या यात्रेत सहभागी झाले होते. नागपुरातील आग्याराम देवी चौक, गांधीसागर, चिटणीस पार्क, बडकस चौक, सी. ए. रोड, वर्धमाननगर, वाठोडा या मार्गावरून यात्रा जात असताना रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागपूरकरांनी अस्थिकलशाचे दर्शन घेत भावनिक आदरांजली वाहिली.

अनेक चौकांमध्ये अस्थिकलशावर पुष्पवृष्टी करण्यात आली, तर काही ठिकाणी स्थानिक नागरिकांनी पूजन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांचे कार्य आणि विचार महाराष्ट्राच्या मातीत सदैव जिवंत राहतील. आज ते शरीररूपाने आपल्यातून गेले असले, तरी त्यांची शिस्त, समाजभान आणि विकासाची दूरदृष्टी कायम प्रेरणादायी राहील, अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शहर आणि नागपूर ग्रामीण भागातून आलेल्या जनसमुदायाच्या श्रद्धेचा स्वीकार करत ही यात्रा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अंभोरा येथील पवित्र त्रिवेणी संगमावर पोहोचली. येथे वैदिक मंत्रोच्चारात आणि शास्त्रोक्त विधीनुसार अस्थी विसर्जन पार पडले. याप्रसंगी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहराध्यक्ष अनिल अहिरकर, ग्रामीण अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी विधिवत पूजन करून साश्रुनयनांनी अस्थींचे विसर्जन केले. यावेळी नागपूर महापालिकेतील नगरसेविका आभा पांडे, प्रशांत पवार, सुनीता येरणे, विशाल खांडेकर, बजरंगसिंह परिहार, चंद्रपाल चौकसे, तानाजी वनवे, बाबा गुजर, नरेश अरसडे, राजू राऊत, प्रवीण कुंटे, रमण ठक्कर, मुकेश रेवतकर, रेखा चरदे, सुनील लाडेकर, रवी महाकाळकर, मनोहर मेश्राम, रोहित मानवटकर, किशोर बेलसरे, कल्ला नायक यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.