बुलढाणा : मावळतीला जाणाऱ्या सूर्याच्या शोकाकुल गहिवरलेल्या हजारो नेते, कार्यकर्ते व चाहत्याच्या साक्षीने दिवंगत अजित पवार यांच्या अस्थी कलशाचे आज देऊळगाव राजा तालुक्यातील संत चोखा सागर ( खडकपूर्णा) प्रकल्पात विसर्जन करण्यात आले.
ज्या प्रकल्पाचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले आणि जलसंपदा मंत्री अजितदादांच्या सहकार्याने पूर्णत्वास गेले त्याच खडकपूर्णा धरणात हे रक्षविसर्जन करण्यात आले, हा दुर्दैवी योगायोग ठरावा.
आज गुरुवारी संध्याकाळी अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे संत चोखा सागर मध्ये धार्मिक विधी आणि शोकाकुल, गंभीर वातावरणात विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी संपूर्ण वातावरण अत्यंत शांत, भावनिक आणि श्रद्धेने भारलेले होते. उपस्थित नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवरांच्या मनात अजितदादांसोबतचे जुने प्रसंग, संघर्ष आणि सामाजिक कार्याच्या आठवणी दाटून आल्या. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात आदरभाव होता.
यावेळी माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार मनोज कायंदे, उपविभागीय महसूल अधिकारी प्राध्यापक संजय खडसे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काजी, शरद पवार गटचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके, देऊळगाव राजा पालिका अध्यक्ष माधुरी शिपने, यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यापूर्वी ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत अस्थिकलश जिल्ह्यातील विविध गावांमध्ये नेण्यात आला होता. या दरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. गावोगावी वातावरण भावनिक झाले होते.
यावेळी डॉ शिंगणे यांनी, अजितदादांनी आपल्या जीवनात जपलेला राजर्षी शाहू महाराज आणि महात्मा फुले यांचा सामाजिक समतेचा, मानवतेचा आणि परिवर्तनाचा विचार पुढील पिढ्यांपर्यंत घेऊन जाण्याचा संकल्प व्यक्त केला. रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप खरात यांनी, अजित पवार यांचा अपघात आहे की घात झाला आहे याची चौकशी करणे गरजेचे आहे.चौकशी जेव्हा पूर्ण होईल तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
अस्थी विसर्जनावेळी आमदार मनोज कायंदे अत्यंत भावूक झाले होते. दीर्घकाळचा सहवास तसेच सामाजिक व सार्वजनिक कार्यातील अनेक आठवणी त्यांच्या मनात दाटून आल्या. या भावनिक क्षणी उपस्थित अनेक नागरिकही अश्रूंना आवर घालू शकले नाहीत.
यापूर्वी…
२०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरे तर २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांचे अस्थि विसर्जन करण्यात आले.आज दुर्दैवाने अजित पवार यांनी पूर्ण केलेल्या प्रकल्पामध्येच त्यांचं अस्थि विसर्जन करण्यात आले.

