भंडारा : राज्याच्या राजकारणातील एक कणखर नेतृत्व, प्रशासनावर मजबूत पकड असलेले जननेते आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे आज भंडारा शहरात आगमन झाले. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात हजारो नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या नेत्याचे अंतिम दर्शन घेतले.

​आज सकाळी ११ वाजता बारामतीहून आणलेला अस्थिकलश दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात ठेवण्यात आला होता. यावेळी गुरुदेव सेवा मंडळ, गणेशपूर यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या भजनांनी वातावरण अधिकच भावूक झाले. शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. ‘दादां’चे सर्वच क्षेत्रातील लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते या गर्दीतून स्पष्टपणे जाणवत होते.

​याप्रसंगी आयोजित शोकसभेत उपस्थितांनी दादांच्या कार्याचा गौरव केला. भंडारा जिल्ह्याच्या सिंचन प्रश्नावर दादांनी दिलेले योगदान अविस्मरणीय असल्याचे मान्यवरांनी सांगितले. यात ​गोसेखुर्द प्रकल्प, ​सुरेवाडा, सोंड्याटोला, नेरला आणि करचखेडा उपसा सिंचन योजना या सारख्या प्रकल्पांसाठी दादांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला, ज्यामुळे जिल्ह्याचा कायापालट झाला.​या शोकाकुल प्रसंगी नाना पंचबुद्धे, आमदार राजू कारेमोरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे, नगराध्यक्षा सौ. मधुरा मदनकर यांच्यासह धनंजय दलाल, सुनील फुंडे आणि जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी दादांसोबत काम करतानाचे अनुभव सांगून त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

​वैनगंगा तीरावर अस्थि विसर्जन

​दुपारी ३:०० वाजता जिल्हा कार्यालयातून अस्थिकलशाची अंतिम यात्रा निघाली. भजन मंडळींच्या सुरावटीत ही यात्रा महाल मार्ग, गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक मार्गे वैनगंगा नदीच्या जुन्या पुलाजवळील घाटावर पोहोचली. तिथे विधिवत पूजा-अर्चा करून अत्यंत भावूक वातावरणात अस्थींचे विसर्जन करण्यात आले. ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.