अकोला : ‘तळागाळातील, सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील अजितदादांनी मोठं केलं. सहा वर्षांपूर्वी भाड्याच्या घरात राहणाऱ्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याला दादांनी आमदार केले. त्यांच्या कृपेनेच माझे घर झाले. त्या घराच्या वास्तूसाठी दादांना वारंवार बोलावले. कामाच्या व्यस्ततेमुळे ते येऊ शकत नव्हते. अखेर अजितदादांची चप्पल चोरून नेत घरात त्याची पूजा केली,’ अशी आठवण अजित पवार यांचे खंदे समर्थक आमदार अमोल मिटकारी यांनी सांगितली. ‘आमचा योद्धाच गेला, आता कसे लढणार?’ असा उद्विग्न सवाल करीत आमदार मिटकरींच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर मोठा आघात झाला. राष्ट्रवादीचे नेते नि:शब्द झाले आहेत. अकोल्यातील अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय आमदार अमोल मिटकरी यांना अतोनात दु:ख झाले. अमोल मिटकरी यांना दु:ख अनावर झाले असून त्यांच्या डोळ्यातून अक्षरश: अश्रूंच्या धारा लागल्या आहेत. अजित दादांविषयीचा आदर व्यक्त करतांना अमोल मिटकरींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
अमोल मिटकरी म्हणाले, ‘भाजपसोबत युती केल्यावरही अजितदादांनी शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचार कधी सोडले नाहीत. दादांवर जीव ओवाळून टाकणारे माणसं आहेत. ते अत्यंत मोठे व्यक्ती होते. दादा गेले, हा अद्यापही विश्वास वाटत नाही. मी भाड्याच्या घरात राहणारा माणूस होतो. सहा वर्षांपूर्वी दादांचा फोन आला, मी तुला आमदार करणार आहे. कागदपत्रे घेऊन ये, असे सांगितले. मी दादांना म्हणालो, माझ्याकडे कुठलेच कागदपत्रे नाहीत. त्यांनी वकील लावून ते कागदपत्रे करून घेतली. नंतर पाच वर्षांनी माझे घर झाले. घराला पाय लावा ही एकच विनंती दादांकडे केली. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने ते येऊ शकत नव्हते. अखेर देवगिरीवर गेला, त्यांची चप्पल चोरून आणली आणि त्याची घरात पूजा केली. दादांप्रति खरी भावना आहे.’
अजितदादांमुळे राजकीय जन्म
‘‘आता लढाई लढू शकत नाही. शस्त्र टाकले. आमचा योद्धाच गेला आहे. लढाई आता संपली. आम्ही तलवारी म्यान केल्या. कोणासोबत लढाई करायची? अजितदादांमुळेच माझा राजकीय जन्म झाला. दादांची पुण्याई होती. आता काय करणार?’’ अशा शब्दांत आमदार अमोल मिटकरी यांनी आपले दु:ख व्यक्त केले.

