Ajit Pawar Passes Away : यवतमाळ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील निधनाने यवतमाळातील विविध राजकीय नेत्यांनीही दुःख व्यक्त करत शोक संवेदना दिल्या.
अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राची, संपूर्ण समाजाची आणि माझीसुद्धा प्रचंड मोठी वैयक्तिक हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. अजितदादा यांच्यासोबत काल मंगळवारीच कॅबिनेट बैठकीत भेट व चर्चा झाली आणि आज हा दुःखद प्रसंग घडला. ही घटना महाराष्ट्राला हादरविणारी आहे. आज परभणी येथील जिल्हा परिषद निवडणुकीचे सर्व कार्यक्रम रद्द करून बारामतीकडे निघाल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.
प्रत्येक वाढदिवसाला सर्वात पहिला फोन अजितदादांचा यायचा. आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी ते कायम माझ्यासोबत असायचे. राजकारणापलीकडे एक मोठा भाऊ म्हणून त्यांचा कायम आधार होता. एखादा विषय सांगितल्यानंतर त्याच्या मुळापर्यंत जाऊन समस्येवर उपाय शोधण्याची त्यांची हातोटी होती. विकासकामांसाठी निधी देताना त्यांनी कधी हात आखडता घेतला नाही. कॅबिनेटमध्ये एखादा विषय मांडण्यासाठी कायम पाठीशी राहायचे, असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
राज्याच्या विकासाबद्दल ते कायमच दूरदृष्टीने विचार करायचे. कधी मिश्कीलपणे तर कधी गांभीर्याने ते सूचना करायचे. आपलुकीच्या नात्याने सांभाळून घेणारे अजितदादा आपल्यात नाहीत ही भावना वेदनादायी आहे. राजकारणापलीकडे मित्रत्व आणि संबंध जपणारा असा लोकनेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या अकाली निधनाने माझी वैयक्तिक आणि महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, संस्कृतिक क्षेत्राची झालेली हानी कधीही भरून निघणारी नाही. या दुःखातून सावरण्याचे बळ पवार कुटुंबियांना मिळो, हीच प्रार्थना असल्याचे मंत्री संजय राठोड म्हणाले.
यवतमाळ जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे अपघाताचे वृत्त समजताच पुसदहून बारामतीकडे रवाना झाले. आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आपल्यात नाही, ही जिव्हारी लागणारी घटना आहे. अजित दादांच्या जाण्याने नाईक परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. स्पष्ट आणि स्वच्छ व्यक्तिमत्व असलेले अजित दादा नाहीत ही कल्पनाचं करवत नाही, अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी व्यक्त केली.
भाजपाचे नेते आणि माजी मंत्री मदन येरावार यांनीही अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली. आपल्या आमदारकी आणि मंत्रीपदाच्या कारकिर्दीत दादांशी अतिशय नियमित संबंध येत असे. त्यांच्याकडून कधीही विरोधी पक्षातील म्हणून वेगळी वागणूक मिळाली नाही. विकासासंदर्भात कोणताही विषय त्यांच्याजवळ मांडला की, त्यावर त्याच क्षणी सकारात्मक निर्णयसुद्धा ते घेत असत. अतिशय स्पष्टवक्ते, शिस्तप्रिय, दूरदृष्टीचे आणि यशस्वी अर्थमंत्री म्हणून अजित पवार संपूर्ण महाराष्ट्राच्या कायम लक्षात राहतील. अजितदादांच्या जाण्यामुळे महाराष्ट्रात कधीही भरून न निघणारी एक पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया मदन येरावार यांनी दिली.
काँग्रेसचे यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी, अजित पवार आपल्यातून निघून गेले यावर विश्वासच बसत नाही, आहे सांगितले. ते अतिशय संघर्षशील व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अतिशय कठीण आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये त्यांचे मोठे योगदान होते. प्रशासनावर पकड असलेले एक दमदार, दिलदार, वेळेचे काटेकोर पालन करणारे शिस्तप्रिय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी दिली.
