नागपूर: Ajit Pawar plane crash: अजित पवार अनंतात विलीन झाले आहेत. त्यांच्या विमानाचा अपघातच होता असे स्पष्टीकरण खुद्द शरद पवार यांनी दिले. असे असले तरी अपघातानंतर अनेक राजकीय चर्चाही सुरू आहेत. यात आता अजित पवारांचे विमान उडवणारे वैमानिक कॅप्टन सुमीत कपूर यांच्याविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधान आले आहे.
अजित पवार यांचे विमान मुंबई ते बारामतीपर्यंत घेऊन जाणाऱ्या व्हीएसआर व्हेचंर्स कंपनीच्या विमानाला बारामती येथे उतरत असताना अपघात झाला. या अपघातात वैमानिक कॅप्टन सुमीत कपूर आणि सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक यांचाही अजित पवार आणि इतरांसह मृत्यू झाला. लिअरजेट ४५ या विमानाचा बारामती विमानतळानजीक अपघात झाला. यात पाच लोकांचा मृत्यू झाला.
अपघातग्रस्त विमानाचे पायलट सुमित कपूर यांचा इतिहास समोर आला असून तो धक्कादायक आहे. १५ हजार तास विमान उडवण्याचा अनुभव असूनही सुमित कपूर यांना दोन वेळा मद्यपान करून सेवेवर आल्यामुळे पकडण्यात आले होते. ज्यासाठी त्यांना तीन वर्षांसाठी निलंबितही करण्यात आले होते. यामुळे दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाला आता एक धक्कादायक वळण मिळाले आहे. या विमानाचे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर यांचा उड्डाणाचा आतापर्यंत कार्यकाळ अत्यंत वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे.
१५ हजार तासांचा दांडगा अनुभव असूनही, सुमित कपूर यांचा भूतकाळ सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाने डागाळलेला आहे. विमान उड्डाणापूर्वी वैमानिकाची मद्यपान केल्याची चाचणी केली जाते. नियमानुसार दारूचा एक थेंबही वैमानिकासाठी गुन्हा ठरतो. २०१७ मध्ये दुसऱ्यांदा दोषी आढळल्यानंतर डीजीसीएने सुमित कपूर यांना तीन वर्षांसाठी निलंबित केले होते. कोणत्याही वैमानिकासाठी ही मोठी शिक्षा मानली जाते. निलंबन काळ संपल्यानंतर त्यांनी पुन्हा उड्डाण सुरू केले आणि ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ या खासगी कंपनीत ते दाखल झाले. ज्या कंपनीकडे राज्यातील अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. त्यांनी सुमित कपूर यांच्या पार्श्वभूमीची योग्य तपासणी केली होती का? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे. बारामती विमानतळावर ज्या पद्धतीने विमानाने पहिल्यांदा लँडिंग मिस केले आणि त्यानंतर ‘गो-अराउंड’ (पुन्हा उड्डाण) घेताना विमान कोसळले, हे पाहता आता जुन्या रेकॉर्डची चर्चा सुरू झाली आहे.
पायलटच्या जुन्या सवयी आणि नियमांचे उल्लंघन करण्याची प्रवृत्ती या अपघाताला कारणीभूत ठरली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमित कपूर यांनी २०१७ च्या निलंबनानंतर नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पुनरागमन करण्यासाठी लागणाऱ्या सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण केल्या होत्या, परंतु त्यांच्या वर्तणुकीच्या पैलूंकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे.
सुमीत कपूर कोण होते?
कॅप्टन सुमीत कपूर हे अपघातग्रस्त विमानाचे पायलट इन कमांड म्हणून काम पाहत होते. फ्लाईट क्रूचे नेतृत्व तेच करत होते. टेक ऑफ आणि लँडिंगचे नेतृत्वही त्यांच्याकडे होते. सुमीत कपूर यांच्याकडे वेगवेगळ्या विमानांचा मिळून १५ हजार तास उड्डाणाचा अनुभव होता. व्हीएसआर कंपनीचे अधिकारी विके सिंह यांनी म्हटले की, दोन्ही पायलट हे दिल्लीचे होते आणि त्यांच्याकडे उड्डाणाचा बराच अनुभव होता. तसेच सदर विमान उड्डाणासाठी १०० टक्के सुरक्षित होते, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

