नागपूर: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले अजित पवार यांनी तीन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीची साथ सोडून भाजपसोबत जाणे पसंत केले. असे असतानाही त्यांनी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची कास सोडली नाही. नागपूरमध्ये होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून दरवर्षी बौद्धीक वर्गाचे आयोजन केले जाते. यावेळी महायुतीमधील सर्वच पक्षांचे नेते हे संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात भेट देतात. येथे डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतात. यानंतर संघाची ओळख करून दिली जाते. मात्र, अजीत पवारांनी भाजपची साथ धरली असली तरी कधीही त्यांच्या विचारांशी तडजोड केली नाही. ते आणि त्यांच्या पक्षातील कुणीही नेते संघाच्या या बौद्धीक वर्गाला गेले नाही. अजित पवारांच्या निधनावर संघाकडून अत्यंत बोलकी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राला आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (२८ जानेवारी) बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले. बुधवारी सकाळी बारामती दौऱ्यासाठी निघताना अजित पवार यांच्या विमानाचा लँडिंग होताना भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. विमानाची स्थिती पाहूनच कोणीही वाचू शकणार नाही अशी माहिती समोर येत होती. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रू अनावर झाले. अवघ्या काही वेळातच अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. त्यांच्या निधनावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.

संघाची प्रतिक्रिया काय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज विमान अपघातात आकस्मिक निधन होणे हे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. त्यांचे दीर्घ आणि प्रभावशाली सार्वजनिक जीवन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि देवाकडे प्रार्थना करतो.

तर पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनीही दु:ख व्यक्त केले. महाराष्ट्राचे संघर्षशील लोकनेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू अत्यंत धक्कादायक आहे. राज्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची ही मोठी हानी झाली असून, विकासाची दूरदृष्टी असलेला एक रोखठोक लोकनेता आपण गमावला आहे. पवार कुटुंबीयांसह सर्व कार्यकर्त्यांना या मोठ्या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अजितदादांसह अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती!