Ajit Pawar Passes Away : बुलढाणा : परखड मते मांडण्यात मागे पुढे न पाहणारा धाडसी नेता, बिकट राजकीय स्थितीतूनही वाट काढून मार्गक्रमण करणारा नेता ही अजित पवार यांची वैशिट्ये दूरवरच्या बुलढाणेकरांनी देखील अनुभवली. वेळोवेळी त्याची प्रचिती घेतली.
डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या जिल्ह्यातील ११ पालिकांच्या निवडणुकीनिमित्त अजितदादानी २६ नोव्हेबर ला जिल्ह्यात झंजावती दौरा केला होता. या दौऱ्यातही दादांच्या या वैशिट्य, राजकीय मुसद्धेगिरी, परिस्थितीनुसार राजकीय तडजोड, तडकाफडकी निर्णय घेण्याची क्षमता याचे दर्शन झाले. बुलढाणा जिल्ह्यातही मोठा भाऊ असलेल्या भाजप आणि नवीन मित्र पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने अनेक ठिकाणी प्रामाणिकपणे युती धर्म पाळला नाही. मात्र त्याची तमा न बाळगता त्यांनी सर्व पालिकांच्या निवडणुका लढण्याचे धाडस दाखविले.
बुलढाण्यात भाजपसोबत युती करताना त्यांनी खामगाव,, चिखली मध्ये भाजपाशी दोन हात केले. चिखलीत काँग्रेसमधून आलेले दिग्गज नेते प्राचार्य निलेश गावंडे यांना अध्यक्ष पदाची उमेदवारी देत शिंदे सेनेशी युती केली. देऊळगाव राजात शरद पवार गटाचे माजी मंत्री राजेंद्र शिंगणे आणि शिंदे सेनेचे माजी आमदार शशिकांत खेडेकर एकत्र आले असता अजितदादानी शिलेदारांच्या मदतीने त्यांचा मुकाबला केला. मलकापूर, खामगावात एकहाती लढत दिली.
राज्याच्या राजकारणात व्यस्त असताना त्यांनी बुलढाण्याचा झंजावती दौरा करीत तीन जाहीर सभा गाजविल्या. वेळेचे आणि घड्याळ्याचे काटेकोर पालन करणाऱ्या अजितदादानी एकाच दिवशी २६ नोव्हेबरला खामगाव, शेगाव, मलकापूर, बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा ला भेटी दिल्या. मलकापूर, चिखली व देऊळगाव राजात घेतलेल्या प्रचार सभा गाजविल्या.
मलकापुरातील संस्मरणीय आक्रमक भाषण
मलकापूर मध्ये भाजपाचे नेते चैनसूख संचेती दीर्घ काळ आमदार आणि पालिकेत काँग्रेसची दीर्घ काळ सत्ता राहिलेली. या दोघांना दादांनी भाषणातून चांगलेच धुतले होते. ‘एका बाजूला पूर्णा मायीची कृपा, दुसऱ्या बाजूला नळगंगा धरणाचे वरदान, तरीही मलकापूरचे नागरिक वर्षानुवर्षे तहानलेलेच! नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर सभेतून जबरदस्त घणाघात केला होता. “ज्यांच्या अंगीच पाणी नाही, ते मलकापूरकरांचे पाणी प्रश्न सोडवणार कसे?” असा थेट सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते.,“कचरा, नाले, रस्ते… मलकापूरची अवस्था आजही सुधारलेली नाही. काँग्रेसने तुमच्यासाठी काय केलं? कोणती समस्या मिटवली? हा विकास म्हणावा का? जर हा विकास असेल, तर जनतेच्या डोळ्यात धूळफेकच झाली.” मलकापूरची जनता यापुढे गप्प बसणार नाही आणि सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. ती सभा आणि दादांचे भाषण खूपच गाजले आणि चिरकाल लक्षात राहणारे ठरले. चिखली व देऊळगाव राजात त्यांनी याच धर्ती वर धुवंधार भाषणे केली .
