प्रसंग हिवाळी अधिवेशनातला. राज्यात महायुतीच्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन. दादांनी थोरल्या साहेबांना सोडून भाजपची कास का धरली हा प्रश्न तेव्हा सर्वाधिक चर्चेत असलेला. तेव्हाच निरोप आला दादांनी त्यांच्या नव्या विजयगड या बंगल्यावर चहापानासाठी बोलावल्याचा. वेळ सकाळी साडेसातची. अजितदादांनी ती दिलेली असल्याने पाळावीच लागणार असे म्हणत सारे संपादक धावतपळत तिथे पोहोचलेले. एरवी कुठल्याही मंत्र्यांच्या निवासस्थानी एवढ्या सकाळी शुकशुकाट असतो पण दादांकडे गर्दी ओसंडून वाहात असलेली. सारे स्थानापन्न झाल्यावर बरोबर दिलेल्या वेळेला दादा आत आले व मग सुरू झाला गप्पांचा फड. अर्ध्या तासाचे हे चहापान दीड तास उलटून गेला तरी सुरूच होते. मी साहेबांना का सोडले इथपासून सुरू झालेला दादांचा कथन प्रवास थांबला तो राष्ट्रवादीचे आमदार रेशीमबागेत जाणार नाहीत या वाक्यावर. भलेही भाजपसोबत गेलो असेन पण धर्मनिरपेक्षतेची भूमिका सोडणार नाही म्हणजे नाही. लोकांना काय कंड्या पिकवायच्यात त्या पिकवू द्या पण मी मात्र भाजपनेत्यांना स्पष्टपणे सांगितले आहे. उजवी विचारधारा कधी स्वीकारणार नाही. दादा हे असे होते. तसे त्यांचे आणि विदर्भाचे नाते कधीच मधुर राहिले नाही. ते विदर्भात आले व निधी वा अनुशेषाच्या मुद्यावरून काही बोलले की विदर्भावादी त्यांच्यावर तुटून पडायचे. गेली अनेक वर्षे सुरू राहिलेला हा सिलसिला. दादा म्हणजे विदर्भाचे वैरी. हक्काचा निधी पळवण्यात वाकबगार असलेले एकमेव नेते म्हणजे दादा अशीच त्यांची प्रतिमा आजवर रंगवलेली. हे करण्यात विदर्भवाद्यांसोबतच भाजपवाले सुद्धा आघाडीवर. हे दादांना ठाऊक होते. तरीही या प्रदेशाच्या दौऱ्यावर येताना, माध्यमांशी बोलताना त्यांनी उमदेपणाचा परिचय देणे कधी सोडले नाही. प्रत्येक अनौपचारिक चर्चेत ते आवर्जून सांगायचे. विदर्भावर अन्याय करणारा मी नाही. मला उगीचच खलनायक ठरवले जाते. मी अर्थमंत्री असतानाच्या काळात विदर्भाला सर्वाधिक निधी दिला. पाहिजे तर हे आकडे घ्या असे म्हणत सोबतची फाईल उघडून दाखवायचे. ‘पावती फाडणे’ हा दादांचा परवलीचा शब्द. माझ्या नावाने उगाच ती फाडली जाते असेही ते म्हणायचे.

सिंचन घोटाळा हा त्यांच्या राजकीय आयुष्याला लागलेला मोठा डाग. याची सुरुवात विदर्भातूनच झालेली. तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी यावरून रान उठवले. केंद्रस्थानी होता तो गोसेखुर्द प्रकल्प. विधिमंडळात भरपूर गदारोळ झाल्यावर या घोटाळ्याची वेगवेगळ्या पातळीवर चौकशी सुरू झाली. गुन्हे दाखल झाले. पण केवळ अधिकारी व कंत्राटदारांवर. नंतर जनमंचने याच मुद्यावरून उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केल्यावर माध्यमांमध्ये दादाविरोधी बातम्यांचा पूर आलेला. या साऱ्या प्रकरणामुळे गोसेखुर्दचे कामच थांबले. यातल्या कथित भ्रष्टाचाराची तडही लागेना व हे कामही सुरू होईना अशी अवस्था निर्माण झाली. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनीच नेमके यावर भाष्य केलेले. नंतर चक्रे पूर्णपणे उलट्या दिशेने फिरली. दादा व फडणवीसांनी एकत्र शपथ घेतली व काही तासाच्या आत त्यांना क्लिनचीट मिळाली. सरकारच्या या घूमजाववर भरपूर टीकाही झाली पण गोसेखुर्दची कामे पुन्हा मार्गी लागली ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. राष्ट्रवादीच्या जन्माला आता २५ वर्षे लोटली. त्याआधी थोरले साहेब जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा विदर्भ त्यांच्या पाठीशी नेहमी उभा राहिला. त्यांनी नवा पक्ष स्थापन केला. साहेब व दादा अशा दोघांनीही अनेकदा विदर्भाचे दौरे केले पण या प्रदेशाने त्यांच्या पदरात मतांचे दान टाकले नाही. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर हा पक्षच कसा विदर्भविरोधी असा प्रचार भाजप व काँग्रेसकडून अतिशय जोमाने झाला. त्यामुळे विदर्भातील देशमुख, शिंगणे, नाईक अशी घराण्यांची सत्ता वगळता या पक्षाच्या पदरात विदर्भातून फारसे काही पडले नाही. पक्षाच्या फुटीनंतरही हेच चित्र कायम राहिले. आता पालिकांच्या निवडणुकीत दादा अमरावतीला येऊन गेले. संजय खोडके त्यांचे तेथील शिलेदार. त्यांनी तिथे बरी कामगिरी बजावली. हेच काय ते दादाला मिळालेले शेवटचे यश.

थोरल्या पवारांच्या तुलनेत दादा तसे जिद्दी व मेहनती. गेल्या दोन-तीन वर्षात सत्तेच्या बळावर त्यांनी विदर्भात पक्ष वाढावा म्हणून भरपूर प्रयत्न करून बघितले. एक शिबीरही नागपुरात घेतले. त्यात दिवसभर बसून त्यांनी या भागातल्या कार्यकर्त्यांची मते मन लावून ऐकली. संघटनात्मक वाढीसाठी जे काही करावे लागते ते सारे त्यांनी केले पण अमरावतीचा अपवाद वगळता फारसे काही हाती लागले नाही. याची खंत ते अनेकदा बोलून दाखवायचे पण अनौपचारिक गप्पांमध्ये. राष्ट्रवादी शरद पवारांची असो वा दादांची. मराठ्यांचा पक्ष असा त्यावर शिक्का बसलेला. विदर्भात वऱ्हाडचा काही भाग वगळला तर मराठा समाजाची संख्या लक्षणीय अशी नाहीच. विदर्भाचे राजकारण ओबीसी व दलित याभोवती फिरणारे. हा चक्रव्यूह थोरले पवार व दादांना कधी भेदता आला नाही. विदर्भाची जनता राष्ट्रीय पक्षाच्या मागे उभी राहणारी आहे. मग ती काँग्रेस असो वा भाजप. प्रादेशिक पक्षांना या भागात फारसे स्थान नाही. तरीही प्रयत्न करत राहायचे. कधीतरी यश मिळेलच की अशी मिश्कील टिप्पणी ते करायचे. राजकारणाचा प्रादेशिक समतोल बघितला तर हे योग्यच. आम्ही तिकडे पश्चिम महाराष्ट्रात तर भाजप इकडे विदर्भात. यामुळे यश मिळवायला सोपे जाते अशी भावना ते व्यक्त करायचे. तुम्ही मला कितीही नावे ठेवा पण गोसेखुर्द व जिगाव हे दोन प्रकल्प पूर्ण करून दाखवीनच. गोसेखुर्द एकदा पूर्ण झाला की माझ्यावरचा एक डाग कायमचा पुसला जाईल. तसाही तो डाग नव्हताच. काही कारण नसताना मला बदनाम केले गेले. जे झाले ते झाले. आता जुने उगाळण्यात काय अर्थ आहे असा सवाल करून त्यांच्या कथनाची गाडी वर्तमानाकडे वळायची.

थोरल्या साहेबांपासून का दूर झालात हे सांगताना शब्दातून त्यांचा उपमर्द होणार नाही यासाठी ते घेत असलेली काळजी समोर बसलेल्यांच्या लक्षात यायची. विरोधकांनी विदर्भविरोधी अशी प्रतिमा निर्माण करून सुद्धा दादांनी या भागातील नेत्यांशी वैयक्तिक पातळीवर मात्र उत्तमपणे संबंध जोपासले. मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना! कुणी चांगला उपक्रम राबवत असेल तर अगदी ठरवून बघायला जाणे, काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यास मदत करणे याची कितीतरी उदाहरणे देता येतील. ओबीसींसाठी नागपुरात मोठे भवन हवे हा मुद्दा निवडणुकांच्या आधी मार्गी लागायला हवा अशी विनंती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दादांना नागपूर विमानतळावर केली. त्यांनी तिथल्या तिथे प्रस्ताव मंजूर केला. विदर्भ हे दादांचे कार्यक्षेत्र नव्हतेच तरीही वैदर्भीय त्यांना नेहमी आठवणीत ठेवतील हे मात्र नक्की!