नागपूर : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी पसरली. परंतु प्रथम त्यावर अनेकांना विश्वासच बसला नाही. एकनाथ शिंदे सरकारमध्ये ते सहभागी झाले आणि त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. नागपुरात उपमुख्यमंत्र्यांसाठी देवगिरी बंगला आहे. परंतु दोन उपमुख्यमंत्री झाल्याने त्यांच्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ‘विजयगड’ हे नवीन निवासस्थान तयार करण्यात आले.

हा बंगला, येथील उद्यानही त्यांना फारच आवडले होते. स्वच्छतेसाठी ते फारच आग्रही असायचे. विजयगड बंगल्यातील वस्तूही त्यांना पसंत होत्या. त्यांनी वस्तूंची जागा निश्चित केली होती. ‘मी येणार आहे. सर्व वस्तू तशाच ठेवा’, अशा सूचना त्यांनी जाताना कर्मचाऱ्यांना केल्या होत्या. या आठवणींना येथील कर्मचाऱ्यांनी उजाळा दिला.

डिसेंबर २०२३ च्या हिवाळी अधिवेशनापूर्वी बांधकाम विभागाकडून अजितदादांचा बंगला तयार करण्यात आला. शाखा अभियंता राजेंद्र बारई यांच्याकडे त्याची जबाबदारी होती. बारई म्हणाले, बंगला तयार करताना त्यांच्याकडून काही सूचना होत्या. बंगल्यावर त्यांचे नाव दिले होते. परंतु ते त्यांनी बदलून घेतले. येथील उद्यानही त्यांना आवडले होते. फुलझाडांची काळजी घ्यायचे. फुलदाणीमधील झाडांकडे त्यांचे लक्ष असायचे. या फुलदाणींमधील मातीत बोट टाकून त्यातील ओलसरपणा बघायचे.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आतील सर्व जागेचे फोटो काढले होते. त्यांना सर्व वस्तू तिथेच हव्या होत्या. ‘मी येणार असून वस्तू तशाच ठेवायच्या’, अशा सूचना त्यांनी केल्या होत्या. बंगल्यामधील कर्मचारी विशाल खडसे व निरज पाटील यांनी सांगितले की, दादा सकाळी सहा वाजता तयार व्हायचे व आलेल्यांची भेट घ्यायचे. वेळेचे पक्के होते. भेटणाऱ्यांनी सांगितलेल्या कामांचा मागोवा घेण्यास सांगत असे. जे होणार नाही, त्याबाबत स्पष्टच सांगायचे. उद्यानाची काळजी घेण्याच्या सूचना त्यांच्या होत्या. ते येण्यापूर्वीच त्यांचे जेवण करणारा यायचा, असे त्यांना सांगितले.