Ajit Pawar Passes Away: राजकीय नेत्यांच्या सततच्या दौऱ्यांमुळे अल्प वेळेत अधिकाधिक सभा आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी हेलिकॉप्टर व छोट्या विमानांचा वापर वाढला आहे. मात्र, अशा प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेली संपूर्ण तांत्रिक तपासणी केली जाते का, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अलीकडील विमानप्रवासाशी संबंधित कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर ते आज नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
राजकीय नेते वेळेच्या मर्यादेमुळे घाईगडबडीत हेलिकॉप्टर किंवा लहान विमानांचा वापर करतात. मात्र, कोणतेही विमान किंवा हेलिकॉप्टर उड्डाण करण्यापूर्वी त्याची सखोल तांत्रिक तपासणी, वैमानिकांचे लॉगबुक, हवामान अहवाल आणि देखभाल नोंदी तपासल्या जाणे अत्यावश्यक आहे. संबंधित घटनेच्या वेळी ही सर्व प्रक्रिया काटेकोरपणे पाळली गेली होती का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.
“अजित पवार हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे आणि वरिष्ठ नेते आहेत. अशा उंचीच्या नेत्याच्या बाबतीत घडलेल्या कोणत्याही घटनेकडे हलगर्जीपणे पाहता येणार नाही. त्यामुळे ही केवळ तांत्रिक बिघाडाची बाब आहे की यामागे काही वेगळे कारण आहे, याचा सखोल तपास व्हायला हवा,” असे राऊत यांनी नमूद केले.
अलीकडच्या काळात राज्यातील राजकारणात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. लहान पक्षाना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकांदरम्यान आरोप-प्रत्यारोप, पक्षफोडीचे राजकारण आणि एकमेकांवर होणारी टीका लक्षात घेता, कोणत्याही संशयास्पद घटनेबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात केवळ प्राथमिक माहितीवर निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञांकडून तांत्रिक चौकशी करावी, अशी त्यांची भूमिका आहे.
डॉ. नितीन राऊत हे स्वतः वैमानिक प्रशिक्षण घेतलेले असून त्यांनी विमान उड्डाण व सुरक्षिततेसंदर्भातील अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राजकीय नेत्यांना आवाहन केले की, वेळेच्या दबावाखाली सुरक्षिततेशी तडजोड न करता प्रत्येक उड्डाणापूर्वी सर्व तांत्रिक बाबींची खात्री करूनच प्रवास करावा. कोणतीही शंका राहणार नाही, यासाठी पारदर्शक चौकशी होणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
