यवतमाळ : बदलापूरच्या घटनेमुळे समाजमन ढवळून निघाले आहे. सर्व स्तरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. विविध सामाजिक, राजकीय संघटना, महिला, विद्यार्थी संघटनांनी या घटनेतील नराधमास फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. बदलापूरवासियांनी अभूतपूर्व आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणही त्याभोवती फिरत आहे. मात्र या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्यासाठी सर्वसामान्यांच्या मनात आरोपीच्या शिक्षेबद्दल जी भावना असते, ती जशीच्या तशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज यवतमाळात बोलून दाखविली.

यवतमाळ येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आज शनिवारी यवतमाळात आले होते. पावसामुळे कार्यक्रम दोन तास विलंबाने सुरू झाला. या कार्यक्रमास सुमारे ५० हजार महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविक केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणास सुरूवात केली. आपल्या रोखठोक शैलीत भाषण करताना ते बदलापूरच्या घटनेचा दाखला देत म्हणाले, सरकार महिला सुरक्षिततेच्या बाबतीत डोळ्यात तेल घालून काम करत आहे. बदलापुरात चिमुरडीवर झालेला अत्याचार प्रचंड चीड आणणारा आहे. या घटनेत किंवा अशाच कोणत्याही घटनेतील आरोपी कोणत्याही राजकीय नेत्याशी, पक्षाशी संबधित असतील तरी गय केली जाणार नाही. कोणाचाही वशिला चालणार नाही. त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशीच सरकारची भूमिका आहे. ‘शक्ती’ कायदा लवकरात लवकर लागू व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून, राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर हा कायदा तत्काळ लागू केला जाईल. त्यामुळे यापुढे अशा नराधमांना थेट फासावरच लटकवले जाईल. अशा नराधमांसाठी माझ्या भाषेत शिक्षा सुनवायची झाल्यास ‘अशा नराधमांचे गुप्तांग कापून टाकले पाहिजे’, अशी तीव्र भावना अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा…योजनेत खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा….मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना आवाहन

अजित पवारांच्या या वक्तव्यावर महिलांमधूनही प्रतिसाद मिळाला. या वक्तव्याने मंचावरील मान्यवरांसह अधिकारी, कर्मचारी, पत्रकारांमध्येही खसखस पिकली. मात्र आजच्या सभेत महिला अत्यांचाराबाबत चीड व्यक्त करत अजित पवार यांनी जी भावना व्यक्त केली तीच सर्वसामान्यांच्या मनातील भावना असल्याची चर्चा सभामंडपात कार्यक्रमानंतर रंगली होती. हे वक्तव्य करून अजित पवारांनी थेट विषयाला हात घातल्याने आता ते सरकारमध्ये असल्याने त्यांनीच याबाबतीत कठोर कायदा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी प्रतिक्रया अनेक महिलांनी यावेळी दिली.