नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर अजूनही उलटसुलट चर्चा सुरू आहे. या चर्चेत आता एका महत्त्वाच्या तपशिलावर लक्ष वेधले गेले आहे. दिवंगत अजित पवार यांनी मृत्यूपूर्वीच्या रात्री ज्या फाईलवर सही केली, ती नेमकी कोणती होती? ती गोंदिया जिल्ह्यातील राईस मिलशी संबंधित होती का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आमदार रोहित पवार आणि सरोज अहिरे यांनी या फाईलबाबत काही खळबळजनक दावे केले आहेत. रोहित पवारांच्या मते, ही फाईल विदर्भातील, प्रामुख्याने भंडारा–गोंदिया पट्ट्यातील एका प्रभावशाली नेत्याशी संबंधित राईस मिलशी जोडलेली होती. त्यांनी थेट नाव न घेता सूचित केले की, महायुतीमधील एका महत्त्वाच्या नेत्याने त्या रात्री अजितदादांना मंत्रालयात किंवा सागर बंगल्यावर थांबवले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही फाईल फक्त परवाना मंजुरीपुरती मर्यादित नव्हती; ती थकीत देयके आणि अनुदानाशी संबंधित होती. सरोज अहिरे यांच्या दाव्यानुसार, विदर्भातील ‘धान खरेदी’ आणि राईस मिलर्सना द्यावयाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या मंजुरीसाठीही ही फाईल होती.

रोहित पवारांनी असेही म्हटले की, एका राजकीय सल्लागाराचे कंत्राट रद्द करून दुसऱ्या कंपनीला काम देण्याच्या प्रक्रियेतही या फाईलचा संबंध होता, ज्यात त्या राईस मिल मालकाचेही हित गुंतलेले होते. ही राईस मिल विदर्भातील धान उत्पादक पट्ट्यात अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, मात्र अलीकडच्या काळात तिच्या विस्तारासाठी आणि सरकारी योजनांद्वारे मोठ्या निधीच्या मंजुरीसाठी ही फाईल तयार करण्यात आली होती, असे समजते.

अधिकृत नोंदींनुसार ही मिल एका खासगी कंपनीच्या नावावर असली तरी तिचे राजकीय धागेदोरे विदर्भातील एका प्रभावशाली नेत्याशी जोडलेले असल्याचे रोहित पवारांनी आरोप केले आहेत.

अजित पवार २७ जानेवारीच्या रात्री पुण्याकडे निघणार होते, पण त्या रात्री या फाईलवर सही करण्यासाठी त्यांना थांबवण्यात आले. रोहित पवारांच्या मते, जर त्या फाईलचा आग्रह धरला नसता, तर दादा रस्त्याने पुण्यात पोहोचले असते आणि विमानाने जाण्याची वेळही वेगळी झाली असती. या फाईलमुळे झालेला उशीरच त्यांच्या अपघाताला कारणीभूत ठरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, त्या रात्री अजित पवारांना कोणत्या नेत्याने थांबवले, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.