गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे मंगळवार, ७ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता व पदाधिकारी मेळाव्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या अधिकृत फलकावर अजित पवार यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, हा मेळावा खासदार प्रफुल पटेल यांच्या गोंदिया या गृह जिल्ह्यात आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे या घडामोडींना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. सदर फलकावर फक्त खासदार प्रफुल पटेल यांचेच छायाचित्र ठळकपणे झळकले. पक्षातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक असलेल्या अजित पवार यांचा फोटो नव्हता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) मध्ये अलीकडच्या काळात सुरू असलेल्या गटबाजीच्या पार्श्वभूमीवर या घटनेचे राजकीय महत्त्व अधिक आहे. दरम्यान, स्वतःला ‘अजितदादा प्रेमी’ म्हणवणारे काही आमदार व पदाधिकारी या प्रकरणावर मौन बाळगून आहेत.

तिरोड्यातील या मेळाव्यात कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला असला, तरी फलक प्रकरणानेच साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. सभेत मांडण्यात आलेल्या विषयांपेक्षा, फलकावरील अनुपस्थिती अधिक चर्चेचा विषय ठरली. राजकारणात शब्दांइतक्याच प्रतीकांचाही प्रभाव असतो, हे पुन्हा एकदा तिरोड्याच्या या फलक घटनेने अधोरेखित केले आहे.