अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनामुळे संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे. नेते हळहळले असून अनेकांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या आहेत. राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून नेत्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी हानी झाली आहे. ते राज्याचे उमदे नेतृत्व होते, अशी शोकसंवेदना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले, ‘‘जे त्यांच्या मनात होते, तेच ओठात होते. कोणाला राग आला तरी चालेल, त्याची पर्वा त्यांनी केली नाही, असे व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून जाणे हे धक्कादायक आहे. सामाजिकरित्या सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका होती. सरकारमध्ये राहूनही सरकारच्या काही कार्यक्रमांना मी जाणार नाही, अशीही त्यांची भूमिका आपण पाहिली आहे.’’

महाराष्ट्राचे मोठे नुकसान – ॲड. आकाश फुंडकर

उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे नेते अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन ही वार्ता मन सुन्न करणारी आहे. नियतीने आपल्या सर्वांवर हा अत्यंत क्रूर आघात केला. त्यांचे जाणे ही केवळ एका पक्षाची किंवा कुटुंबाची हानी नसून, संपूर्ण महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे मोठे नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत झाला, अशा शब्दात कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

मन जिंकणारा लोकनेता हरपला – आमदार रणधीर सावरकर

स्पष्ट वक्ता, कार्यकर्त्यांचा मन जिंकणारा लोकनेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाची बातमी ही वेदना देणारी दुःखदायी आहे. विकासाची संकल्पना घेऊन सरळपणे नागरिकांशी संवाद साधत सतत कार्यमग्न राहणारे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या निधनाने फार मोठी हानी झाली, अशी भावना विधिमंडळातील भाजपचे मुख्य प्रतोद तथा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली.

अपरिमित हानी – खासदार अनुप धोत्रे

अकोला जिल्ह्याच्या विकासाला मदत करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने अपरिमित हानी झाली. माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सातत्याने प्रेम करणारे मार्गदर्शक आपण गमावले आहेत, अशा शब्दात खासदार अनुप धोत्रे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

राजकारणातील दादा माणूस गेला – पवळ

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनामुळे राजकीयसह सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले. अतिशय कडक, शिस्तीचे, स्पष्टवक्ते आणि भल्या पहाटे कामास सुरुवात करणारे नेते होते. मनाने तितकेच हळवे आणि त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच कधीही भरून न निघणार नुकसान झाले, अशी शोकसंवेदना शिवसेना शिंदे गटाचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी व्यक्त केली.