नागपूर : अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. २८ जानेवारीला अजित पवार खाजगी विमानाने सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान सकाळी ८.४६ वाजता विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत २९ जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मात्र अजित पवार यांच्या निधनाला दहा दिवसही पूर्ण झाले असताना आणि सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असतानाही राज्य शासनाच्या दरबारी मात्र अद्यापही एक घोळ चूक करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ‘महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धा’ ही हौशी कलाकारांसाठी एक प्रमुख व्यासपीठ आहे. ६४ व्या हिंदी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी ३ ते १४ फेब्रुवारी २०२५ मध्ये होत आहे. या स्पर्धेत सहभागी संस्थांना नाटकाच्या निर्मिती खर्चासाठी अनुदान व रोख पारितोषिके दिली जातात. या स्पर्धेची पत्रिका सर्वत्र देण्यात आली असून यामध्ये अद्यापही उपमुख्यमंत्री म्हणून अजित दादांचा फोटो लावण्यात आलेला आहे.
नाट्य स्पर्धेच्या पत्रिकेवर सांस्कृतिक संचालनालय तर्फे ही स्पर्धा घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा फोटो लावण्यात आलेला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. अजित पवार यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी लोकभवनवर साध्या पद्धतीने झाला.
यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची परंपरा कायम राखली. सकाळी लवकर मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

