अकोला : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात चौकशी केली जात असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक प्रश्न उपस्थित केले. ‘‘अजितदादा गेल्यानंतर डीजीसीएला यातल्या चुका दिसल्या का? विमान अपघात होऊन अजितदादांचा जीव तुमच्या याच चुकांमुळे गेला आहे,’’ असा गंभीर आरोप अमाेल मिटकरी यांनी केला.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. या सर्व घटनेवर आमदार अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक मुद्दे उपस्थित केले. संशयाचे काहूर निर्माण झाले. या विमान अपघात प्रकरणाची चौकशी केली जात आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघात प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. व्हीएसआर व्हेंचर्स या विमान कंपनीची चार विमाने ग्राऊंड करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, याच मुद्द्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी ‘डीजीसीए’वर निशाणा साधला. त्यांनी समाज माध्यमातून पोस्ट करीत गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हणाले मिटकरी?
अमोल मिटकरी म्हणाले, ‘‘अजितदादा गेल्यानंतर DGCA ला यातल्या चुका दिसल्या का? अजितदादांचा जीव हा तुमच्या याच चुकांमुळे गेला आहे. गुन्हा कोणावर दाखल केला आहे? अटक कोणाला केली आहे? फक्त विमानाची उड्डाण थांबून दादा परत येणार आहेत का? आमचा हा लढा इथेच थांबणार नाही. आता कारवाई झाल्या नाहीत तर अजितदादांवर जीव ओवाळणारा कार्यकर्ता आवरल्या जाणार नाही. लढा इथून सुरू झाला. सत्यमेव जयते!’’
अनेक प्रश्न अनुत्तरीत
अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेले अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी अपघात व सुरक्षा दोषांचा इतिहास असलेल्या Learjet 45 विमानाची निवड कोणी व कोणत्या निकषांवर केली? अहवालांनुसार पूर्वी अल्कोहोल संबंधित कारणांवर शासकीय कारवाई व निलंबनाची नोंद असलेल्या पायलट सुमित कपूर यांची ऐनवेळी नियुक्ती कोणाच्या निर्णयाने झाली? असे अनेक प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले आहेत.

