अकोला: अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणातील पायलट सुमित कपूर जिवंत असल्याची माहिती समोर येत असल्याच्या खळबळजनक दाव्यासह आमदार अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या विविध शंका कुशंकांमुळे संशयाचे ढग अधिक गडद झाले आहेत. दादा जीवनातील रंगच घेऊन गेले आहेत. यावर्षीचे होळी फक्त राख आणि आठवणींची धग आहे, भावना देखील मिटकरी यांनी व्यक्त केली.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत २८ जानेवारीला निधन झाले. या घटनेवर अमोल मिटकरी यांनी संशय व्यक्त करीत अनेक मुद्दे उपस्थित केले. या विमान अपघात प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या चौकशीवर देखील अमोल मिटकरी यांनी असमाधान व्यक्त केले. अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या चौकशीच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांच्यासोबत अमोल मिटकरी दिसून आले. या प्रकरणी मिटकरी यांनी आणखी काही दावे केले आहेत.

अजितदादा पवार यांच्या विमानातील पायलट सुमित कपूर जिवंत असल्याचीही माहिती समोर येत आहे. सुमित कपूर कॅलिफोर्नियात असल्याची माहिती आहे. सुमित कपूर जर जिवंत असतील तर याचा अर्थ DGCA ने आधी ६ माणसे विमानात होती सांगितले, त्यानंतर ५ जणांचा मृतदेह सापडला, असं सांगितले. याचा अर्थ त्या विमानात सुमित कपूर नव्हते. शांभवी पाठक विमान चालवत होती का? असेही प्रश्न मिटकरींनी उपस्थित केले आहेत.

VSR कंपनी आणि त्यांच्या विमानावर ताशेरे ओढले आहेत. मग एफआयआर नोंदवून घेताना इतका संघर्ष का करावा लागत आहे. शेवटपर्यंत पोलिसांनी हा एफआयआर नोंदवून घेतला नाही. मग हाती काय येणार आहे?, माझ्या विवेकबुद्धीला जे पटते ते मी बोलतो, मी जे बोलतो ते चुकीचे नाही, हे मला माहिती आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. आता इतर आमदार का बोलत नाही हे माहिती नाही, असे मिटकरींनी स्पष्ट केले.

‘…म्हणून रोहित पवार यांच्या बाजूने’

पवार कुटुंबातील एक व्यक्ती गेली. त्यामुळे रोहित पवार बोलत आहेत. या प्रकरणात कुणी चमकोगिरी करीत नाही. अपघाताची चौकशी करावी, यात चुकीचे काय? रोहित पवार अपघाताबाबत जे बोलत आहेत, त्याच्या बाजूने मी आहे. इतर राजकीय गोष्टींवर मी त्यांचे समर्थन करत नाही, असेही अमोल मिटकरींनी सांगितले.