नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातानंतर विमानातील ‘ट्रान्सपोंडर’ या यंत्रणेची चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी अपघाताच्या अवघ्या एक मिनिट आधी विमानातील ट्रान्सपोंडर बंद करण्यात आल्याचा संशय व्यक्त करत या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर ‘ट्रान्सपोंडर’ म्हणजे नेमके काय, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
आकाशात उड्डाण करणाऱ्या प्रत्येक विमानाची ओळख, त्याचे अचूक स्थान, उंची आणि वेग याची माहिती हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एअर ट्रॅफिक कंट्रोल – एटीसी) सतत मिळत असते. ही माहिती देण्याचे काम ‘ट्रान्सपोंडर’ हे अत्याधुनिक उपकरण करते. जमिनीवरील रडार केंद्रातून पाठवण्यात आलेल्या रेडिओ सिग्नलला प्रतिसाद देत ट्रान्सपोंडर विमानाची ओळख (कोड), उंची आणि अन्य तपशील परत पाठवतो. त्यामुळे नियंत्रण कक्षाला संबंधित विमानाची हालचाल अचूकपणे समजते.
विशेषतः गर्दीच्या हवाई मार्गांवर, रात्रीच्या उड्डाणांत किंवा खराब हवामानात ट्रान्सपोंडरची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते. आधुनिक विमानांमध्ये ‘मोड-सी’ आणि ‘मोड-एस’ प्रकारचे ट्रान्सपोंडर बसवलेले असतात. ‘एडीएस-बी’ (ऑटोमॅटिक डिपेंडंट सर्व्हेलन्स–ब्रॉडकास्ट) प्रणालीद्वारे काही विमानं आपली माहिती थेट प्रसारित करतात. आपत्कालीन प्रसंगी वैमानिक विशिष्ट कोड सेट करून नियंत्रण यंत्रणेला तत्काळ इशारा देऊ शकतो.
सुरक्षित आणि शिस्तबद्ध हवाई वाहतुकीसाठी ट्रान्सपोंडर ही यंत्रणा अनिवार्य मानली जाते. त्यामुळे या यंत्रणेभोवती निर्माण झालेल्या शंकांकडे गंभीरतेने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अपघाताच्या एक मिनिट आधी ट्रान्सपोंडर का बंद करण्यात आला? बारामती एटीसीने सुरक्षित मानल्या जाणाऱ्या धावपट्टी क्रमांक २९ वर उतरण्याची सूचना दिली असताना वैमानिकाने ११ क्रमांकाच्या धावपट्टीचा आग्रह का धरला? हवामान स्वच्छ असतानाही दृश्यमानता कमी असल्याचे का सांगण्यात आले? तसेच, नियमांचे उल्लंघन करून विमानात पेट्रोलचे कॅन का ठेवले होते? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

