नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. या संकट काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. पवार आणि देशमुख कुटुंबीयांमध्ये घनिष्ठ संबंध होते. अनिल देशमुख तुरुंगात असताना अजित पवार सातत्याने त्यांची विचारपूस करत असत. विधीविषयक तसेच आर्थिक अडचणींबाबतही ते नियमितपणे चौकशी करत होते. देशमुख कुटुंबावर आलेल्या संकटाच्या काळात अजित पवार कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, अशी आठवण माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितली.

अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत काटोल मतदारसंघातील विकासकामे रखडू नयेत, यासाठीही अजित पवार यांनी सक्रिय सहकार्य केले. या कामानिमित्ताने माझी त्यांच्याशी वारंवार भेट होत असे, अनिल देशमुख यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी विमान घेऊन अजित पवार भेटीसाठी आले होते. “बाबा तुरुंगात असताना अजितदादांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत केली. मतदारसंघातील विकासकामांसाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांची शेवटची नागपूर भेट महापालिका निवडणूक प्रचारासाठी अमरावतीला येताना झाली होती.

चार दिवसांपूर्वी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर त्यांची भेट झाली होती. त्या वेळी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांबाबत चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले असले, तरी दोन्ही गटांतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांचे विचार अनेक बाबतीत जुळतात, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. त्यामुळे ते सर्व कार्यकर्त्यांना आपलेच मानत असत. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता, असे भावोद्गार सलील देशमुख यांनी व्यक्त केले.