विद्युतमध्ये रूपांतरित करण्याची कामगार संघटनांची मागणी

नागपूर : रेल्वेने पुढील नऊ वर्षांत देशातील सर्व गाडय़ा डिझेल इंजीनऐवजी विजेवर चालवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील अजनी आणि मोतीबाग येथील डिझेल इंजिन दुरुस्ती केंद्राचे (डिझेल) रूपांतर विद्युत इंजिन दुरुस्ती केंद्रात करून मध्य भागातील प्रमुख केंद्राचे महत्त्व कायम ठेवणार काय, याकडे लक्ष लागले आहे.

मध्य रेल्वेने पुढील दोन वर्षांत ब्रॉडगेजचे विद्युतीकरण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. तर देशभरातील इतरही ठिकाणी केवळ विजेवर चालणाऱ्या इंजिनचा वापर होईल. या दिशेने पावले टाकली जात आहे. त्यामुळे रेल्वे कामगार संघटनांनी डिझेल इंजिन देखभाल-दुरुस्ती केंद्राचे रूपांतर विद्युत इंजिन देखभाल-दुरुस्ती केंद्रात करावे,

अशी मागणी आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने मोतीबाग येथील डिझेलचे रूपांतर नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये केले आहे. या देखभाल दुरुस्ती केंद्राला सध्या कामही भरपूर आहे. रेल्वे यॉर्डातील शंटिंग आणि घाट सेक्शनमध्ये वापरण्यात येणाऱ्या डिझेल इंजिनची देखभाल दुरुस्ती मोतीबाग आणि अजनी येथील डिझेल शेडकडे आहे.

शिवाय अजनीला विजेवर चालणाऱ्या इंजिनची देखभाल-दुरुस्ती केंद्र आहे. नागपुरात रेल्वेचे दोन वेगवेगळे विभाग असल्याने दोघांची स्वतंत्र यंत्रणा आहे. परंतु अत्याधुनिकरणात या दोन विभागातील डिझेल इंजिन दुरुस्ती केंद्र बंद करावे लागणार आहे.  यासंदर्भात सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे सचिव जी.एम. शर्मा म्हणाले, रेल्वेने शंभर टक्के विद्युतीकरणाचा संकल्प केला आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु अजून घाट सेक्शनमध्ये डिझेल इंजिनचा वापर केला जातो. याशिवाय नागपूर, अजनी रेल्वे यार्डमध्ये शंटिंग करण्यासाठी डिझेल इंजिनचा वापर केला जातो.

वाराणसी येथील डिझेल इंजिन कारखान्यातून उत्पादन बंद करण्यात आले आहे. जुने झालेले इंजिन भंगारात टाकण्यात येत आहे, तर उर्वरित इंजिन शंटिंगसाठी वापरण्यात येत आहे. नागपूर यॉर्डात दोन आणि अजनी यॉर्डात दोन असे चार डिझेल इंजिन वापरण्यात येत आहेत. या इंजिनची कार्यक्षमता संपल्यानंतर त्यांचा वापर बंद केला जाईल आणि त्याऐवजी विद्युत इंजिन उपयोगात आणले जाईल, असे रेल्वेचे अधिकारी सांगतात. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेतील कामगार संघटनांनी देखील आतापासून  मोतीबाग येथील इंजिन दुरुस्ती केंद्र कायम राहावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी इंजिन दुरुस्ती केंद्राबाबत निर्णय आवश्यकतेनुसार प्रशासन घेईल, असे सांगितले.