नागपूर : अजनी पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी धक्कादायक घटना होता होता थोडक्यात वाचली. स्टेशन डायरी परिसरातील छताचे पॅनेल अचानक कोसळल्याने काही काळ पोलिस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. सुदैवाने, ज्या टेबलवर पोलीस कर्मचारी नियमित बसून काम करतात, त्या ठिकाणी संबंधित कर्मचारी कामानिमित्त शेजारच्या खोलीत गेला होता. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.
आणखी समाधानाची बाब म्हणजे घटना घडली त्या वेळी स्टेशन डायरीजवळ कोणताही तक्रारदार किंवा नागरिक उपस्थित नव्हता. त्यामुळे संभाव्य अपघातही टळला. अन्यथा या घटनेचे स्वरूप अधिक गंभीर ठरले असते, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
घटनेनंतर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी केली. मात्र, या घटनेनंतर इमारतीच्या इतर भागांतील पॅनेल, छताची स्थिती आणि संपूर्ण संरचनेची तांत्रिक तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. इमारतीत अशा प्रकारचे इतर धोके आहेत का, याची स्वतंत्र अभियांत्रिकी तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.
विशेष म्हणजे, पोलिस ठाण्याच्या आवारात तुलनेने प्रशस्त मोकळी जागा उपलब्ध आहॆ. त्यामुळे या ठिकाणी आधुनिक सुविधा, प्रशस्त कार्यालयीन व्यवस्था, सुरक्षित संरचना, डिजिटल सुविधा आणि नागरिकाभिमुख सेवा असलेली स्मार्ट अजनी पोलिस स्टेशनची नवी इमारत उभारण्याची मागणी आता अधिक तीव्र होत आहे.
नेमके काय घडले सकाळी…
अजनी पोलिस ठाण्याची इमारत अनेक वर्षांपूर्वीची आहे. येथील अनेक खोल्या आकाराने लहान आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मर्यादित जागेत काम करावे लागते. स्वच्छतागृहांच्या देखभालीबाबत तसेच इतर मूलभूत सुविधांचा देखील येथे आभाव आहे. तक्रार देण्यासाठी य़ेणाऱ्या नागरिकांना देखील ठाण्याबाहेर उघड्यावरील बाकावरच बसावे लागते. त्याच वेळी रविवारी सकाळी पावसामुळे फुगलेला छताच्या पॅनलचा भाग अचानक कोसळ्याने या जिर्ण इमारतीचा मुद्दा चर्चेत आला आहे. शिवाय ठाण्याच्या शेजारील पोलीस निवासी संकुल भागात काही इमारती धोकादायक झाल्याने त्या बंद करण्यात आल्या आहेत.
स्मार्ट ठाण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत…
नवीन आणि सुसज्ज इमारतीमुळे शहरात आदर्श ठरलेल्या लकडगंज पोलिस ठाण्याचा दाखला देत, त्या प्रकल्पासाठी झालेल्या पाठपुराव्याप्रमाणेच अजनी पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीसाठीही शासन स्तरावर पुढाकार घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी संबंधित लोकप्रतिनिधींनी आणि गृह विभागाने सकारात्मक दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या ठाण्यांच्या सुरक्षेवर पुन्हा चर्चा
अजनी पोलिस ठाण्यातील पॅनेल कोसळल्यानंतर सुदैवाने जीवितहानीविना झाली नसली तरी ही घटना सार्वजनिक वापराच्या इमारतींच्या सुरक्षेकडे गंभीर इशारा देणारी ठरली आहे. अजनी प्रमाणेच धंतोली आणि इमामवाडा पोलीस ठाण्यांच्या इमारती देखील जिर्ण झाल्या आहेत. या शिवाय सोनेगाव पोलीस ठाण्यात पावसाळ्यामध्ये दरवेळी विमानतळाकडून पुराच्या पाण्याचा लोंढा येतो. त्यामुळे हे पोलीस ठाणे देखील पाण्यात जाण्याची जोखीम असते. त्यामुळे या ठाण्यांमध्ये केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता संपूर्ण इमारतीचे संरचनात्मक सुरक्षा परीक्षण करून आवश्यक नवीन, सुरक्षित आणि आधुनिक स्मार्ट पोलिस स्टेशन उभारण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
