अकोला : अंमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र अकोला झाले का? असा प्रश्न निर्माण झाला असून शहरात उघडपणे अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. या गंभीर प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तरुणांवर लक्ष ठेऊन त्यांना रंगेहात गजाआड केले. या प्रकरणात आरोपींकडून तब्बल १६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
शहरातील विविध भागात सर्रास अंमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचे चिंताजनक परिस्थिती आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेला रामदास पोलीस ठाण्यांतर्गत गांजाची तस्करी केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. काही तरुण अंमली पदार्थ गांजा विक्रीसाठी रेल्वेस्थानक येथून मनपा सेमीइंग्रजी मुला व मुलींची वरिष्ठ प्राथमिक शाळा क्र. सातच्या समोरील पाण्याच्या टाकी जवळ रामदास पेठ येथून जाणार असल्याचे कळले. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नाकाबंदी केली. या नाकाबंदीदरम्यान बादल लाला कांबळे, सुनील व्दारकाप्रसाद यादव व रोशन भास्कर सोनोने (सर्व रा. कैलास टेकडी, खदान अकोला) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळील सामानाची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण १६ किलो गांजा आढळून आला. त्याची किंमत तीन लाख २० हजार रुपये आहे. तिन्ही आरोपींकडे तीन वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल जप्त केले. त्याच्या ३० हजार रुपयांच्या किंमतीसह एकूण तीन लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरूद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये कारवाई करून त्यांना पुढील तपासासाठी रामदासपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि गोपाल जाधव, पो.उप.नि. माजीद, सहा. पोलीस उपनिरीक्षक राजपालसिंह ठाकुर, पोलीस अंमलदार उमेश पराये, खुशाल नेमाडे, धीरज वानखडे, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर व चालक विनोद ठाकरे, अक्षय बोबडे यांनी केली.
अंमली पदार्थांची वाहतूक?
अकोला शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. जिल्ह्याच्या सीमा मध्य प्रदेश राज्याशी जोडल्या आहेत. अकोला जंक्शन रेल्वेस्थानक असून अनेक राज्यात जाणासाठी येथून रेल्वे गाड्या उपलब्ध असतात. त्यामुळे अकोल्यातून अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याचा संशय असून त्या दृष्टीने देखील तपास करण्याची गरज आहे.