अकोला : जीवनातील वाढत्या ताण-तणावामुळे युवक, पुरुषांच्या व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहे. दारू, गांजासारखे व्यसन केल्यावर विचारक्षमता क्षीण होऊन नियंत्रण राहत नाही. त्यामुळेच चिमुकल्या मुली, युवती व महिलांचे शोषण होणाऱ्या गैरकृत्याच्या प्रकारात वाढ झाली आहे, असा निष्कर्ष राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य तथा अभ्यासक डॉ. आशा मिरगे यांनी नोंदवला.

बदलापूर येथे चिमुकल्या मुलींच्या अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त होत आहे. त्यातच अकोला जिल्ह्यातसुद्धा नराधम शिक्षकाने आठवीतील सहा मुलींना अश्लिल चित्रफित दाखवून त्यांचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाराच्या असंख्य घटनांचा अभ्यास असलेल्या डॉ. आशा मिरगे यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधला. अत्याचाराच्या बहुतांश घटनांसाठी त्यांनी व्यसनाधीनतेला कारणीभूत ठरवले आहे. त्या म्हणाल्या, समाजात विद्यार्थिनी, युवती व महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. असंख्य घटनांचा मी अभ्यास केला. त्यातूनच हे स्पष्ट मत मांडत आहे. समाजात विकृती वाढली. त्यामागे अनेक कारणे आहेत. देशातील महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आदींसह जीवनात येणाऱ्या विविध अडचणींमुळे तणावात प्रचंड वाढ झाली. त्या ताण-तणावातून मुक्त होण्यासाठीच व्यसनाकडे वळतो. दारू, गांजा, ड्रग्ससारखे व्यसनांचे साधन आज सहज उपलब्ध आहेत. अनेक जण व्यसनाच्या आहारी जातात. एकदा व्यसन केले की विचार क्षमतेवर त्याचा प्रभाव होतो. लैंगिक इच्छेवर नियंत्रण राहत नाही. त्यातूनच अत्याचाराच्या संतापजनक घटना घडत आहेत.

हेही वाचा – VIDEO : ‘खैके पान बनारस वाला’ गाण्यावर डान्स अन् निलंबनाची कुऱ्हाड; नागपुरातील ते चार पोलीस…

समाजात जनजागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे. शालेय विद्यार्थ्यांना देखील जागृत केले पाहिजे. अत्याचारासोबतच समाजात प्रचंड प्रमाणात फोफावलेल्या व्यसनाधीनतेवर देखील नियंत्रण मिळवणे काळाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यामध्ये सत्ताधारी व प्रशासनाची मुख्य भूमिका आहे. मात्र, सध्या कायदा व सुव्यवस्था कुठेही दिसून येत नाही. अवैध व्यवसाय व गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वचक नाही, असा आरोप देखील त्यांनी केला.

हेही वाचा – Rain Updates : राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ विभागांना ‘यलो अलर्ट’

कुटुंबातील संवाद हरवला

जीवनात सातत्याने वाढत असलेल्या तणावातून व्यसनाधीनता, अत्याचाराच्या घटना घडतात. आज प्रत्येक कुटुंबातील आपसातील संवाद हरवला. नातेसंबंध दुरावले आहेत. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी कोणीही नसते. त्यातून जीवनात तणाव वाढत जातो आणि मग तो व्यक्ती चुकीच्या मार्गावर लागतो, असे डॉ. आशा मिरगे यांनी सांगितले.