अकोला : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक होत असून कृषी निविष्ठा विक्रीत अनियमितता होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणात कृषी विभागाने मोठी कारवाई केली. तपासणी आणि सुनावणीअंती सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले, तर तीन केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. या कारवाईमुळे नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्या केंद्रचालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
कृषी केंद्रांवर कठोर कारवाई
कृषी निविष्ठा विक्रीत अनियमितता करून शेतकऱ्यांची फसवणूक प्रकरणात तपासणी व सुनावणीदरम्यान समाधानकारक खुलासा देण्यात आला. त्यामुळे अकोट तालुक्यातील बोर्डी येथील राय कृषी सेवा केंद्र, अकोली जहाँगीर येथील मोहन ट्रेडर्स, तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बु. येथील महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र, पातूर तालुक्यातील सस्ती येथील शिवशक्ती ॲग्रोटेक, पातूर येथील खानापूर रस्त्यावरील शेतकरी कृषी सेवा केंद्र, वाडेगाव येथील बळीराजा कृषी सेवा केंद्र आणि बादलापूर येथील जगदंब ॲग्रो एजन्सीज व ॲग्रोटेक या सात केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथील आपलं ग्रोमर कृषी सेवा केंद्र यांचे एका महिन्यासाठी, तेल्हारा तालुक्यातील वारखेड येथील शेतकरीपुत्र कृषी सेवा केंद्राचे दोन महिन्यासाठी व कापशी रोड येथील मातोश्री कृषी सेवा केंद्राचे एका महिन्यासाठी परवाना निलंबन करण्यात आले आहे.
१६ कृषी केंद्रांमध्ये गंभीर व नियमबाह्य प्रकार
कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) तालुका कृषी अधिकारी कार्यालय व कृषी अधिकारी, पंचायत समिती यांनी कार्यक्षेत्रातील विविध कृषी केंद्रांची अचानक तपासणी केली. या मोहिमेत एकूण १६ कृषी केंद्रांमध्ये गंभीर व नियमबाह्य प्रकार आढळून आले. ‘ई-पॉस’ यंत्रामधील अधिकृत साठा आणि प्रत्यक्ष दुकानात उपलब्ध साठा यात मोठी तफावत आढळली. दुकानात साठा फलक आणि चालू दर फलक अद्ययावत ठेवले नव्हते. तसेच, शेतकऱ्यांना अधिकृत देयके न देणे किंवा दिलेली देयके विहित नमुन्यात नसणे, केंद्राचे अधिकृत परवाना व नोंदणी प्रमाणपत्र ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी न लावणे आदी त्रुट्या आढळून आल्या आहेत. जिल्हा स्तरावरील सुनावणीत कडक कारवाई केली.
…तर थेट फौजदारी गुन्हे दाखल होणार
कोणत्याही कृषी केंद्रचालकाने बियाणे किंवा खतांचा काळाबाजार केला, जास्त दराने विक्री केली किंवा पक्के देयक देण्यास नकार दिला, तर शेतकऱ्यांनी त्वरित कृषी अधिकारी कार्यालयातील ‘तक्रार निवारण कक्षात’ संपर्क साधून लेखी तक्रार करावी. खरीप हंगामात बियाणे, खते किंवा कीटकनाशकांची विक्री करताना कोणत्याही प्रकारचा काळाबाजार, साठेबाजी किंवा बळजबरीने उत्पादनांची लिंकिंग खपवून घेतली जाणार नाही. अनियमितता आढळलेल्या केंद्रांवर प्रशासकीय कारवाई केली. ही मोहीम अधिक तीव्र करून दोषींवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी सांगितले.
