अकोला : शहरातील ब्रिटिशकालीन शिवणी विमानतळाचे संत गजानन महाराज विमानतळ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सादर केला. विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान संत गजानन महाराजांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी केली आहे.

पश्चिम विदर्भातील पहिले ब्रिटिशकालीन शिवणी विमानतळावरून हवाई सेवा सुरू होण्यासाठी धावपट्टी विस्तार आवश्यक आहे. १९४३ मध्ये शिवणी विमानतळाची उभारणी केली. विदर्भाची पंढरी संतनगरी शेगाव अकोल्यापासून ४५ कि.मी. दूर आहे. अकोल्यातून विमान सेवा सुरू झाल्यास राज्य, देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी मोठी सुविधा होईल.

संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगाव येथे मोठ्या प्रमाणात भाविक पुणे, मुंबई, इतर मोठ्या शहरांसह देशभरातून येतात. उत्कृष्ट व्यवस्थापनासोबतच मानवतेच्या कार्यामुळे संत गजानन महाराज संस्थानच्या कार्याचा सर्वदूर नावलौकिक आहे. अकोल्यातील हजारो भाविक दर गुरुवारी मोठ्या संख्येने शेगावला पायदळ वारीने जातात. संत गजानन महाराज भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे शहरातील शिवणी विमानतळाला संत गजानन महाराज विमानतळ हे नाव देण्यात यावे, अशी आग्रही मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी दिल्ली येथे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली.

यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा अनुप धोत्रे यांनी ही मागणी केली होती. महाराष्ट्र सरकार या संदर्भातील ठराव मंजूर करून केंद्र शासनाकडे पाठवल्यास त्वरीत कारवाई करून भाविकभक्तांच्या भावना जपण्यात येतील, असे आश्वासन मुरलीधर मोहोळ यांनी दिले. गजानन महाराजांचा मी सुद्धा भक्त आहे. विदर्भातील असंख्य नागरिक पुण्यात असून त्यांचा पाठिंबा मिळाला, असे मोहोळ यांनी सांगितले.

धावपट्टी विस्तारीकरणासाठी भूसंपादन

शिवणी विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यासाठी भूसंपादनाचे काम सुरू झाले आहे. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. लवकरच १८०० मीटर लांब धावपट्टी केली जाईल. त्यासाठी राज्य शासन आणि केंद्र सरकार आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. विशेष पायलट प्रशिक्षण केंद्राची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या विमानतळावरून छोटी विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात अनेक कंपन्याशी चर्चा सुरू असल्याचे अनुप धोत्रे यांनी सांगितले. हवाई सेवा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.