अकोला : बालविवाह मोठी समस्या आहे. ते रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे असते. त्याातच अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाह सुद्धा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विवाहासाठी शुभ; मुहूर्तावर बालविवाहाची कुप्रथा आजही कायम

अक्षयतृतीयेचा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे. या शुभमुहूर्तावर सामूहिक तसेच एकल विवाह समारंभ होतात. विवाहासाठी हा अत्यंत शुभ मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या शुभमुहूर्तावर बाल विवाह करण्याची कुप्रथा आजही ग्रामीण भागातील अनेक गावात पाळली जाते. यावर आळा बसवण्याचे मोठे लक्ष्य संबंधित यंत्रणे पुढे आहे. विवाहासाठी शासनाने मुलाचे २१ वर्ष व मुलींचे वय १८ वर्ष वय निश्चित केले. यापेक्षा कमी वयाचे मुलामुलींचा विवाह झाल्यास तो बालविवाह ठरतो व असे विवाह बालविवाह प्रतिबंध अधिनीयम २००६ नुसार बेकायदेशीर ठरतात. अशा कृतीविरोधात गुन्हा नोंदवण्याची तरतूद आहे.

ग्राम बाल संरक्षण समित्या गठीत

कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी असून शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी आहेत. गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या गठीत असून सरपंच त्या समितींचे अध्यक्ष आहेत. पोलीस पाटील हे गाव व पोलीस ठाणे यांना जोडणारा मुख्य दुवा आहे. गावात जर कोणाचा विवाह ठरल्यास त्यांच्या वयाची खात्री करावी व अक्षय तृतीयेला गावात होणारे विवाह सोहळ्यांमध्ये बालविवाह होणार नाही, याची दक्षता सरपंच पोलीस पाटील व ग्रामसेवक व पोलीस विभाग यांनी घेणे आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

… तर बालविवाहातील वाजंत्री, गुरुजी, पालकांसह सर्व उपस्थितांवर गुन्हे दाखल

बालविवाह झाल्यास विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होणारे वाजंत्री, मंगल कार्यालये, बिछायत केंद्र, विवाह विधी पार पाडणारे, मुलामुलींचे आई वडील या सर्वांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. बालविवाह झाल्यास दोन लाख रूपये दंड व दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षेचे प्रावधान कायद्यात आहे. बालविवाह होणार नाही याबाबत सर्वानी दक्ष राहून बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. गावात बालविवाह ठरला असेल तर त्याची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये यंत्रणेच्या सतर्कतेतून अनेक बलविवाह रोखण्यात यश आले आहे. तरीही ग्रामीण भागातील अनेक गावात बालविवाह केले जात असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही.