अकोला : कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसतांना जन्माची नोंद करून तब्बल ११०१ बोगस प्रमाणपत्राचे वाटप २०२५ या एकाच वर्षांत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातील आलेगाव ग्राम पंचायतमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात चार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर विशेष चौकशी समिती नेमली होती. त्यामध्ये बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिक आहे का? याचा शोध प्रशासनाने घ्यावा. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचा मुद्दा भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद आ.रणधीर सावरकर यांनी पत्रकार परिषदेत मांडला.
सखोल तपासणीसाठी विशेष तपास पथक
आलेगाव ग्रामपंचायतमध्ये २०२५ वर्षांमध्ये ११०१ जन्माच्या नोंदी असून याची तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य गुन्हे विभागाच्या उपमुख्यनिबंधकांकडून जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले होते. जिल्हा परिषदेच्या सांख्यिकी अधिकाऱ्यांनी ग्रा.पं.मध्ये पडताळणी करून अहवाल सादर केला. त्यावर ग्रा.पं.कडून सादर केलेला खुलासा अमान्य करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल तपासणीसाठी विशेष तपास पथक स्थापन केले.
कोणत्याही कागदपत्रांविना जन्म नोंदी
११०१ जन्म नोंदणीपैकी ४१ नोंदीची तपासणी केली. २६ जन्म नोंदीचे कोणतेही कागदपत्रे आढळले नाहीत. ११०१ प्रमाणपत्रांपैकी अनेक नोंदी कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसतांना घेण्यात आल्याचे आढळून आले. ११०१ दिलेल्या जन्म दाखल्यापैकी एकाही अर्जदाराचा अर्ज प्राप्त नाही. एकाही प्रकरणामध्ये शुल्क आकारण्यात आलेले नाही, असे प्रकार तपासणीमध्ये आढळून आले. ग्रामपंचायत आलेगाव अंतर्गत गोळेगाव असून गोळेगावचा स्वतंत्र आयडी असून सुद्धा ग्रामपंचायत आलेगावच्या सी.आर.एस. पोर्टलच्या आयडीमधून जन्म नोंदीचे अनेक प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार घडला आहे.
कट रचून बोगस जन्म प्रमाणपत्राचे वाटप
चार ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून आपल्या कार्यकाळामध्ये जन्म नोंदी घेतांना कट रचून मूळ नोंदी नसलेले बनावट दाखले निर्माण केले. २०१६ नंतर सी.आर.एस. पोर्टलमध्ये नवीन जन्म नोंदी अपेक्षित असतांना अवैध नोंद करून दाखले देण्यात आल्याची तक्रार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत पवार यांनी दाखल केली. या प्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात तत्कालीन ग्रा.पं.अधिकारी आर.एच. देशमुख, जे. पी. तायडे, पी. एम. निमसरकार व गणेश जाधव यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ते ११०१ लोक कोण?
१० हजार लोकवस्तीच्या गावामध्ये अवघ्या एका वर्षांत ११०१ जन्माची नोंद झाली. हे प्रकार करण्यामागे संबंधित कर्मचाऱ्यांचा उद्देश काय होता? याचा शोध घेणे गरजेचे आहे. ते ११०१ लोक कोण आहेत, याचाही प्रशाासनाने शोध घेतला पाहिजे. सखोल तपासणी होणे आवश्यक असून राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील गुन्हे एफआयआरमध्ये दाखल करावे, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली.
