अकोला : अंमली पदार्थाविरोधात अकोला पोलिसांनी मे महिन्यात विशेष मोहीम राबवून तब्बल ७८ किलो गांजा जप्त केला. एकूण २२ प्रकरणांमध्ये १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तरुण पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी सुद्धा सावध राहणे गरज आहे. शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात अंमली पदार्थांच्या गैरवापरावर जनजागृती करण्यासह व्यसनमुक्ती केंद्रे व पुनर्वसन केंद्रात समुपदेशन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.
जिल्हास्तरीय ‘नार्को कोऑर्डिनेशन सेंटर’ समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक सीमा झांबरे, प्रवर डाक अधीक्षक सीव्ही रामा रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, वाहतूक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अजित कुंभार म्हणाले की, जिल्ह्यातील व्यसन मुक्ती केंद्राची वेळोवेळी तपासणी करून उपचार घेणाऱ्यांकडून अंमली पदार्थ सेवनासंदर्भात संपूर्ण माहिती घ्यावी. अंमली पदार्थ उपलब्ध होण्याचे मार्ग तपासावे तसेच व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार घेणाऱ्यांचे समुपदेशन करावे. रेल्वे स्थानकावर तपासण्या वाढवाव्यात.
अकोला पोलीस विभागाच्यावतीने १ ते ३१ मेदरम्यान राबविण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेंतर्गत २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये १९ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून १५ लाख ६२ हजार ३४४ रुपये किमतीचा ७८ किलो ७२४ ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली. अंमली पदार्थ तस्करी विरोधी धोरणात्मक बाबींमध्ये समन्वय राखणे, वाढत्या अंमली पदार्थाच्या वापरावर आळा घालणे, अंमली पदार्थाबाबतची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हास्तरीय ‘नार्को कोऑर्डिनेशन सेंटर’ समिती कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जागरूक होऊन दूर राहणे आवश्यक
अंमली पदार्थ मानवी शरीरावर आणि मनावर नकारात्मक परिणाम करतात. या पदार्थांच्या सेवनाने व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थिती बिघडते. तसेच व्यसन निर्माण होऊ शकते. अंमली पदार्थांमध्ये अनेक प्रकार येतात. अंमली पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या धोक्यांबद्दल जागरूक होऊन त्यांच्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेंतर्गत अकोला पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून अकोला शहरात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे स्पष्ट आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांचे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी लक्ष्य असून त्यांनी सावध राहण्याची गरज आहे.