अकोला : फायनान्स कंपनीने न्यायालयाच्या आदेशानुसार कर्जदार शेतकऱ्याच्या घराला सील ठोकले. त्यामुळे दिव्यांग शेतकऱ्याला कुटुंबासह घराबाहेर दोन-तीन दिवस काढावे लागले. या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे नेते आ. बच्चू कडू यांनी शेतकऱ्याचे घर गाठून फायनान्स कंपनीने लावलेले कुलूप हातोड्याने तोडले. याची संपूर्ण जबाबदारी माझी असून शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार असेल तर हे कायदे तोडायला आणि मरायला तयार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

नेमकं घडलं काय?

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निंबा येथील गोपाल राठोड या शेतकऱ्याच्या घरावर फायनान्स कंपनीचे कर्ज आहे. ते कर्ज थकल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार सील लावले. मात्र, या घटनेची माहिती मिळताच बच्चू कडू यांनी थेट निंबा गाव गाठले आणि हातोड्याने कुलूप तोडत राठोड कुटुंबाला घरात प्रवेश करून दिला. गोपाल राठोड यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. करोना काळात त्यांच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाला. कुटुंब अडचणीत असताना फायनान्स कंपनीने दोन ते तीन दिवसांपूर्वी कंपनीने घर सील केले. या कुटुंबाला घरात प्रवेश मिळवून देत बच्चू कडू यांनी फायनान्स कंपन्यांना इशारा दिला आहे.

कंपन्यांविरोधात आपला हातोडा तयार – बच्चू कडू

गरजू कुटुंबांना त्रास दिला, तर अशा कंपन्यांविरोधात आपला हातोडा तयार असेल, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. शेतकऱ्यासोबत असे घडल्याचे कळताच, त्याने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या घरी जायचे आणि त्या घराचे कुलूप तोडायचे हे ठरवले. हे शेतकरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कुटुंबासह बाहेर झोपले. कुटुंबात लहान मुली आहेत. दुष्काळाचे गंभीर संकट आहे. हा शेतकरी शेत विकायला तयार होता, पण त्याला कोणीही घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी कायदा हातात घेतला, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

कर्ज थकले म्हणून माणुसकीही संपली का?

६० टक्के दिव्यांग असलेले गोपाल राठोड यांच्या डोक्यावरील आधी वडिलांचे छत्र हरपले, नंतर मुलाचाही मृत्यू झाला. आर्थिक संकटामुळे कर्जाचे हप्ते थकले अन् फायनान्स कंपनीने घराला सील लावले. ज्या घरात आयुष्याच्या आठवणी जपल्या, त्याच घराच्या दारात दोन दिवस उघड्यावर राहण्याची वेळ आली. कर्ज थकले म्हणून माणुसकीही संपली का? गरीब, दिव्यांगाच्या डोक्यावरचे छप्पर हिरावून घेणे हा कसला न्याय? असे प्रश्न बच्चू कडू यांनी केले आहेत.