अकोला : जिल्ह्यातील बार्शीटाकळी पोलीस ठाण्यांतर्गत महान धरणाजवळ जंगलामध्ये एकाच दोरीने गळफास घेऊन दोघांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर आले आहे. किशोर बळीराम सोनटक्के (वय ४० रा. कानडी ता. मुर्तिजापुर जि. अकोला), किशोर मारोती बोडखे (वय ६० रा. वरुड ता. मंगरुपीर जि. वाशीम) अशी मृतकांची नावे आहेत.

नेमकं प्रकरण काय?

बार्शीटाकळी पोलीस ठाण्यांतर्गत गळफास घेतलेल्या अवस्थेत दोघांचे मृतदेह आढळून आले होते. किशोर सोनटक्के हे ०९ मेपासून घरातून बेपत्ता होते. पिंजर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, तर किशोर बोडखे बेपत्ता असल्याची तक्रार मंगरूळपीर पोलीस ठाण्यात दाखल होती. किशोर सोनटक्के यांचा भाचा रोहन दत्तात्रय महल्ले यांच्या ‘व्हॉट्सॲप’वर एक चिठ्ठी टाकून निंबाच्या झाडाला महान धरणाजवळ जंगलामध्ये दोघांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. नातेवाईकांना केलेला शेवटचा कॉल रेकॉर्डिंग पोलिसांना प्राप्त झाले. व्हॉटस्ॲपवर प्राप्त झालेली मृत्यूपूर्व चिठ्ठी आणि घटनास्थळाच्या परिस्थितीवरून प्रथमदर्शनी दोघांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात अगोदर आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली होती.

पोलिसांना मिळाला सुगावा आणि प्रकरणाला मिळाली कलाटणी

पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये मृतकाच्या खिशात मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये मृतक यांनी नीलेश मोतीराम चौधरी, पूजा नीलेश चौधरी यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण मानसिक त्रास, धमक्या व छळामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चिठ्ठीच्या आधारे आरोपींविरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात कलम १०८, ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

आरोपी नीलेश मोतीराम चौधरी याला बार्शीटाकळी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभगीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके, बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळू पवार करीत आहे. मानसिक त्रास, धमक्या व छळामुळे दोघांनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.