अकोला : समाजातील माणुसकी, संवेदनशीलपणा हरवत चालला आहे. अकोल्यातील एका अपघाताच्या घटनेवरून त्याचा प्रत्यय आला. बियरच्या बाटल्या व कॅनच्या पेट्या वाहून नेणाऱ्या पिकअप व्हॅनचा शुक्रवारी सायंकाळी शहरातील खडकी भागात अपघात झाला.अपघातानंतर वाहनामध्ये बियर असल्याचे समजताच तळीराम अक्षरश: त्यावर तुटून पडले. काही मिनिटांमध्येच तळीरामांनी वाहनातील सर्व बियरच्या बाटल्या लंपास केल्या.अपघातग्रस्त वाहनाचा चालक आणि क्लिनर जखमी होऊन वेदनेने विव्हळत असतांनाच तळीराम मात्र त्यांना मदत करण्याऐवजी रस्त्यावरच फुटकची बियर रिचवण्यात व्यस्त झाले.पोलिसांनी घटनास्थळ गाठून गर्दीला पांगवले.
या घटनेचे विदारक दृश्य अनेकांनी आपल्या कॅमेरात कैद केले असून त्याची चित्रफित समाजमाध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे. शहरातील औद्योगिक वसाहत परिसरातून बियरच्या बाटल्या व कॅनच्या पेट्यांनी भरलेले पिकअप वाहन महामार्गावरून जात होते. त्यावेळी महामार्गावर खडकी भागात ते वाहन उलटले.हा अपघात घडताच परिसरातील नागरिकांची गर्दी जमा झाली. सुरुवातील या वाहनामध्ये काय आहे? हे कुणाला कळले नाही. मात्र, या वाहनामध्ये बियरच्या बाटल्या आहेत, हे उपस्थितांना लक्षात येताच त्या लुटण्यासाठी परिसरातील तरुणांसह तळीरामांची मोठी झुंबड उडाली. या घटनेची वार्ता शहरात वाऱ्या सारखी पसरली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या गावातील तरुणांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी घटनास्थळ गाठून वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न केला.
नागरिकांनी अपघातग्रस्त चालक आणि क्लिनरला मदत करण्याऐवजी बियर लुटण्यासाठी धूम ठोकली. वाहनावर चढून आतील बियरची लूट केली. बियरच्या बाटल्या घेऊन अनेक जण पसार झाले. जखमी चालक व क्लिनरला वाचवण्यासाठी कोणी पुढे आले नाही. अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. माणुकी म्हणून अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी नागरिकांनी बियर लुटण्याला प्राथमिकता दिली.
बियरच्या पेट्या, बाटल्या, कॅन उचलण्यात तळीराम गुंग होते. काही तळीरामांनी रस्त्यावरच बियर रिचवण्यास देखील सुरुवात केली. अपघातस्थळी रस्त्यावर बियरच्या बाटल्या व कॅनचा खच पडला होता. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तोपर्यंत तळीरामांनी वाहन खाली केले होते. पोलिसांनी जमावाला पांगवले. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेची चांगलीच चर्चा असून माणुकी मेल्याची भावना व्यक्त केली जात आहे.