अकोला : पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्यात अंधश्रद्धा शिगेला पोहोचली. अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावातून एक जीवाचा थरकाप उडवणारा प्रकार समोर आला. अवघ्या काही महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला एक बाबा तोंडाने उचलून गरगर फिरवत असल्याची चित्रफित समाज माध्यमातून चांगलीच प्रसारित झाली. अंगावर काटे आणणाऱ्या अघोरी उपचारामुळे चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणी बाल कल्याण समितीच्या तक्रारीवरून भोंदूबाबावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन सुनील मुळे (वय २४ वर्ष रा. निंबा) असे त्या भोंदूबाबाचे नाव आहे.
अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार
राज्याच्या विविध भागातून अंधश्रद्धेचे असंख्य प्रकार समोर येत आहेत. अंधश्रद्धेतून भोळ्याभाबड्या नागरिकांची फसवणूक व आर्थिक लूट केली जाते. या अंधश्रद्धेची पाळेमुळे विशेषत: ग्रामीण भागात खोलवर रुजली आहेत. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावातून एक असाच धक्कादायक व तेवढाच थरारक प्रकार समोर आला. ग्राम निंबा येथील चेतन मुळे याची मागील काही दिवसांपूर्वीची एक चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित झाली. स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करून तो दरबार भरवत होता. त्या बाबाने बाळाच्या कपड्याला दाताने पकडून त्याला उचलले. त्यानंतर बाळाला त्याच अवस्थेत बाबाने जोरात गोल-गोल फिरवले. यावेळी बाळ प्रचंड रडत होता. पुढे बाबा बाळाला जमिनीवर ठेऊन त्याला उलटं-पालटं करत होता. या अघोरी प्रकाराची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित होताच मोठी खळबळ उडाली. लहान मुलांवर उपचारासाठी अंधश्रद्धेतून अघोरी पद्धतींचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
बालकल्याण समितीने घेतली दखल; विविध गंभीर गुन्हे दाखल
या प्रकरणी बाल कल्याण समितीचे सदस्य प्रांजली जैस्वाल यांनी मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून भोंदूबाबा चेतन मुळे याच्या विरुध्द कलम १२५ बी.एन.एस. सहकलम ७५ बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ (बालकांवरील कृरता) तसेच कलम ३ महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम कायदा २०१३ (अंधश्रध्दा पसरविणे व अमानुष कृत्य) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास केला जात आहे. राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी तळागाळातून प्रभावी जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.
