अकोला : महापालिकेत मुस्लीम नगरसेवकांच्या मतांच्या बळावर भाजपने सत्ता स्थापन केली. बहुमतासाठी नगरसेवकांना तीन कोटी रुपये दिले. जनता भाजी बाजारात दुकान देण्याचे आमिषही दाखविण्यात आल्याचा आरोप भाजप विरोधी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
अकोला महापालिकेत भाजप नेतृत्वातील ‘शहर सुधार आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर, तर उपमहापौरपदी भाजपचेच अनिल गोगे विजयी झाले. त्यांना ८० पैकी ४५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवारांना ३२ मते पडली. भाजपचे अपक्ष बंडखोर नगरसेवक आशिष पावित्रकर यांनी देखील भाजपच्या बाजूने मत दिले, तर ‘एआयएमआयएम’चे नगरसेवक तटस्थ राहिले. पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आणि वंचित आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.धैर्यवर्धन पुंडकर यांनी भाजपवर निशाणा साधला.
भाजपचे हिंदुत्व कोणते, हेच समजत नाही. निवडून येण्यासाठी जातीची भाषा केली जाते आणि सत्तेसाठी ‘एआयएमआयएम’ला सोबत घेतले जाते. या निवडणुकीत ‘एआयएमआयएम’ने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. निवडणुकीच्या काळात ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा देणारी भाजप सत्तेसाठी मुस्लीम नगरसेवकांच्या मतावर अवलंबून आहे, अशी टीका आमदार नितीन देशमुख यांनी केली. भाजपविरोधी आघाडीच्या सर्व बैठकांना राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि ‘एआयएमआयएम’चे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
काँग्रेस, वंचित आणि शिवसेना ठाकरे गट हे तीनच पक्ष भाजपच्या विरोधात उभे राहिले. इतर त्यांच्यासोबत गेल्याने भाजपची सत्ता स्थापन झाल्याचा आरोप वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला. निवडणुकीत भाजपने पैशांचा वापर केला असून, बहुमत मिळविण्यासाठी संबंधित नगरसेवकांना प्रत्येकी तीन कोटी रुपये देण्यात आले आले. शिवाय जनता भाजी बाजारात दुकान देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप साजिद खान पठाण यांनी केला आहे.
विरोधकांना पराभवाचे नैराश्य
महापालिका निवडणुकीत काँग्रेस, वंचित व शिवसेना ठाकरे गटाला मतदारांनी नाकारले आहे. तरीही त्यांनी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांना अपयश आले. पराभवाच्या नैराश्येतून विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असा पलटवार भाजपने केला आहे. संबंधितांनावर मानहानीचा दावा करण्याचा इशारा राष्ट्रवादी शहर पवार गटाने दिला. हरल्यावर दुसऱ्यावर आरोप करण्याची काँग्रेसची जुनीच पद्धत असल्याची टीका ‘एआयएमआयएम’ पक्षाने केली.

