अकोला : ‘महापालिका निवडणुकीत भाजपमध्ये राहून पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम करणाऱ्यांची नावे समोर आली आहेत. योग्य वेळी त्याची दखल घेऊन कारवाई केली जाईल. देवेंद्रजींनंतर पक्षात मीच करेक्ट कार्यक्रम करतो,’ असा गर्भित इशारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी दिला.

अकोला महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला असून महापौर व उपमहापौर पदावर भाजपचे नगरसेवक विजयी झाले. त्यानंतर पक्ष कार्यालयात आयोजित बैठकीत आमदार रणधीर सावरकर बोलत होते. अकोला महापालिकेत भाजप नेतृत्वातील ‘शहर सुधार आघाडी’ची सत्ता स्थापन झाली आहे. महापौरपदी भाजपच्या शारदा खेडकर, तर उपमहापौरपदी भाजपचेच अनिल गोगे विजयी झाले. त्यांना ८० पैकी ४५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवारांना ३२ मते पडली.

भाजपचे अपक्ष बंडखोर नगरसेवक आशिष पावित्रकर यांनी देखील भाजपच्या बाजूने मत दिले, तर ‘एआयएमआयएम’चे नगरसेवक तटस्थ राहिले. अकोला महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकला आहे. अकोलेकरांनी कुठल्याही एका पक्षाला बहुमत दिले नाही. सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपला रोखण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोट बांधली. मात्र, भाजपने शहर सुधार आघाडी नावाने ४४ नगरसेवकांचा गट स्थापन स्थापन करून विरोधकांचे प्रयत्न उधळून लावले.

महापौर पदासाठी भाजपच्या शारदा खेडकर व शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सुरेखा काळे व उपमहापौर पदासाठी भाजपचे अनिल गोगे व काँग्रेसचे आझाद खान अलीयार खान यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत शहर सुधार आघाडीच्यावतीने भाजपच्या शारदा खेडकर महापौरपदी, तर उपमहापौरपदी अनिल गोगे ४५ नगरसेवकांची मते घेऊन विजयी झाले. या निवडीनंतर पक्ष कार्यालयात आमदार रणधीर सावरकर यांनी भाजपमध्ये राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला.

आमदार रणधीर सावरकर म्हणाले, ‘पक्षाच्या बाहेर राहून विरोधात काम केले तर काही हरकत नाही. त्यांच्या विषयी मतान कुठलाही राग नाही. मात्र, काही जणांनी भाजपमध्ये राहून पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केले. त्यांच्यावर योग्य कारवाई करू. देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर मीच करेक्ट कार्यक्रम करतो.’ अकोला महापालिकेत महापौर व उपमहापौरांची निवड होताच पक्षांतर्गत विरोधात काम करणाऱ्यांना आमदार रणधीर सावरकर यांनी खडेबोल सुनावले आहेत. कठोर कारवाई करण्याचे संकेत देखील त्यांनी दिले आहेत.