अकोला : महापालिकेत सत्ताधारी स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल व शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सागर भारुका यांच्यातील वाद आता पक्ष पातळीवर गेला. या वादातून भाजप व शिवसेना शिंदे गटातील संघर्ष टोकाला गेला आहे. महापालिका परिसरात शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी अग्रवाल यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी सागर भारुका यांच्यावर गुन्हे दाखल केले. दरम्यान, कोतवाली चौकात भारुका यांच्या समर्थनार्थ लागलेले फलक अतिक्रमण विभागाकडून हटविण्यात आले. हे फलक फाडल्याचा आरोप करून शिवसेना शिंदे गटानेही आक्रमक भूमिका घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नेमका वाद काय?
अकोला महापालिकेत सोमवारी स्थायी समितीच्या सभेत सभापती विजय अग्रवाल आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सागर भारुका यांच्यात मोठा वाद झाला. दोघांमध्ये प्रचंड शाब्दिक चकमक उडाली. दोन्ही बाजूने एकमेकांवर शिवीगाळ झाली. वाद चांगलाच पेटला असतांना सभापती विजय अग्रवाल यांनी सागर भारुका यांना निलंबित केले. विजय अग्रवाल यांचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप सागर भारूका यांनी केला.
वादाचे पडसाद पुन्हा उमटले
स्थायी समितीच्या सभेतील वादाचे पडसाद बुधवारी पुन्हा एकदा महापालिकेच्या परिसरात उमटले. आपल्याला कुठल्या अधिकारात निलंबित केले, असा सवाल सागर भारुका यांनी करून भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्याच वेळी सभापती विजय अग्रवाल त्या ठिकाणी आल्याने दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. दोन्ही बाजूने प्रचंड शिवीगाळ करण्यात आली. सागर भारुका विजय अग्रवाल यांच्या अंगावर धावून देखील गेले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व नगरसेवकांनी दोघांनाही रोखले. या प्रकरणी विजय अग्रवाल यांनी थेट शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठून सागर भारुका यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी शिवीगाळ, जीवे मारण्याच्या धमकीचे विविध कलमान्वये सागर भारुका यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.
फलक प्रकरणात शिवसेना पदाधिकाऱ्यांची पोलीस ठाण्यात धाव
या वादाच्या पार्श्वभूमीवर सागर भारुका यांच्या समर्थनार्थ कोतवाली चौकात काही फलक लावण्यात आले होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ते फलक काढण्यात आले. यावेळी ते फलक फाडण्यात आल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला. शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख राजन साळवी, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन एकतर्फी गुन्हे कसे दाखल केले? असा जाब विचारला. राजकीय दबावातून कारवाई केल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. फलक फाडणाऱ्या कर्मचाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी केली
