अकोला : समस्त हिंदुंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला अकोल्यातून ‘डिजिटल टच’ प्राप्त झाला. अकोलेकर अभिषेक मानोरकर यांनी आपल्या तांत्रिक कौशल्यातून नेत्रदिपक ‘थ्री डी ॲनिमेशन’ आणि ‘लेझर शो’ साकारला. अयोध्येतील श्रीराम मंदिरात त्याचे अद्भूत दर्शन होत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर होत असलेला कार्यक्रम सर्व भाविकांचे लक्ष वेधून घेतो. अभिषेक मानोरकर यांचे हे कलाकौशल्य अकोलेकरांसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीत भव्य-दिव्य रामलल्लाचे मंदिर उभारले. संपूर्ण भाविकांसह देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी हे मंदिर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या मंदिराचे भव्य स्वरूप सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अकोल्यातील तरुण कलाकार अभिषेक मानोरकर यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेला ‘लेझर शो’ सध्या समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य आणि सूक्ष्म दृष्टिकोनातून तयार केलेला हा विशेष कार्यक्रम रामभक्तांच्या मनात अभिमानाची भावना जागृत करणारा ठरत आहे. या चित्रफितीमध्ये मंदिराचा प्रवेशद्वार, विस्तीर्ण प्रांगण, सभामंडप, शिल्पसज्ज खांब तसेच गर्भगृहाकडे जाणारा मार्ग यांचे अचूक आणि आकर्षक दर्शन होते. वास्तवदर्शी प्रकाशयोजना आणि वास्तूतील नक्षीकामाचे बारकावे जपून केलेले हे सादरीकरण कलात्मक ठरले. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या मुख्य शिखरावर श्री सीतारामजींची अद्भूत छटा तर ‘लेझर शो’मधून भगवान श्रीराम व माता सीतांच्या विवाहाचा प्रसंग सादर करण्यात आला आहे.

‘डिजिटल’ क्षेत्रात नव्याने पुढे येणाऱ्या तरुणांसाठी अभिषेक मानोरकर यांचे कार्य प्रेरणादायी आहे. परंपरा, श्रद्धेला आधुनिक तंत्रज्ञानाची सुंदर जोड देऊन समन्वय साधला. धार्मिक-सांस्कृतिक दृष्टिकोनातून त्यांनी केलेल्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आगामी काळात अशा आणखी अनेक प्रकल्पांवर काम करण्याचा त्यांचा मानस आहे. अभिषेक मानोरकर यांच्या या सृजनशील डिजिटल योगदानामुळे अकोल्याची कला व कौशल्याची परंपरा नव्या आधुनिक रूपात उजळून निघत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दैवी अनुभव

अयोध्या येथील श्रीराम मंदिरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे अकोलेकर कलावंत अभिषेक मानोरकर यांचा नीलेश देव मित्र मंडळाच्यावतीने सन्मान करण्यात आला. अभिषेक मानोरकर यांनी मंदिराची भव्यता, रामायणातील प्रेरणादायी प्रसंग, तसेच भारतीय संस्कृतीचे तेज यांना आधुनिक तंत्रज्ञानातून अद्वितीय आणि प्रभावीरुप दिले. प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी ॲनिमेशन तयार करणे हा दैवी अनुभव असल्याचे अभिषेक मानोरकर यांनी सांगितले.