अकोला: रस्त्यांवर कानठळ्या बसवणारे फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या बुलेटच्या बनावट सायलेन्सरविरोधात अकोला शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईचा बडगा उगारला. या विशेष मोहिमेदरम्यान ३५० बनावट बुलेट सायलेन्सर आणि ७० फॅन्सी क्रमांक पाट्यांवर रोडरोलर फिरवून ते चिरडण्यात आले.
ध्वनी प्रदूषणाचा मोठा त्रास; कारवाईत ३५० सायलेन्सर जप्त
बुलेटला बेकायदेशीरपणे लावलेल्या बनावट सायलेन्सरमधून निघणाऱ्या प्रचंड आवाजामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास आजारी नागरिक, वयोवृद्ध, लहान मुले आणि विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो. या प्रकरणी नागरिकांकडून वाहतूक शाखेकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार शहर वाहतूक शाखेसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवली. मोटार वाहन कायद्याच्या कलम १९८ नुसार, ज्या सायलेन्सरच्या आवाजाची तीव्रता ८० डेसिबलपेक्षा जास्त असते, अशा वाहनांवर वाहतूक शाखेतर्फे कायदेशीर कारवाई करीत ३५० बनावट सायलेन्सर जप्त केले.
दादा, भाऊ, काका, मामाच्या पाट्यांवरही कारवाई
गाड्यांवर दादा, भाऊ, काका, मामा असे लिहीत बेकायदेशीरपणे वापरलेल्या ७० फॅन्सी क्रमांक पाट्याही जप्त करण्यात आल्या होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली व शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान जप्त करण्यात आलेले ३५० बनावट बुलेट सायलेन्सर आणि ७० फॅन्सी पाट्या जुने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावर रोडरोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले आहेत.
कंपनीचे मूळ सायलेन्सरच वापरा, अन्यथा कठोर कारवाई
न्यायालयाची पूर्वपरवानगी आणि पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मान्यतेने कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर, पाट्या सर्व साहित्य रोडरोलरखाली चक्काचूर करण्यात आले. वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. बुलेटधारकांनी आपल्या वाहनाला कंपनीकडून मिळालेल्या मूळ (कंपनी फीटेड) सायलेन्सरचाच वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
वाहनांवर ई-चलानचा दंड थकीत
वाहन चालवताना परवाना व वाहनाची मूळ कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावीत. तसेच ज्या वाहनांवर ई-चालानचा दंड थकीत असेल, त्यांनी तो त्वरित वाहतूक पोलीस किंवा शहर वाहतूक शाखेत जमा करावा. तपासणीदरम्यान बेकायदेशीर बनावट सायलेन्सर आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करून सायलेन्सर जप्त केले जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला.
