अकोला : शहरात दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कामावर असलेल्या हमालानेच त्याच्या इतर साथीदारांसह हा कट रचला. मालक व्यापाऱ्याचे हातमाय बांधून चार लाख रुपये रोख व सुमारे ५० लाखांचे सोन्याचे दागिने दरोडेखाेरांनी लंपास केल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

व्यापाऱ्याला बांधून मारहाण  

शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्यांतर्गत मोहता मील मार्गावर नया जीन परिसरात विजयकुमार गुप्ता यांचे वास्तव्य आणि ‘गुप्ता फ्लॉवर ऑइल इंडस्ट्रीज’ नावाने व्यवसाय आहे. सोमवारी गुप्ता हे कामगारांना सूचना देत होते. मात्र, त्याच वेळी दबा धरून बसलेल्या तिघांनी त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला चढवला. त्यांनी गुप्ता यांना जबर मारहाण केली आणि त्यांचे हात-पाय घट्ट बांधून एका खोलीत डांबून ठेवले.

घरातील तिजोरीवर डल्ला

आरोपींनी घरातील तिजोरीवर डल्ला मारला. यामध्ये गुप्ता यांचे अडीच लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीचे दीड लाख रुपये अशी मिळून एकूण चार लाखांची रोख आणि सुमारे ५० लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन आरोपी पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.

हमालाने मालकाचा केला विश्वासघात

दरोड्याचा मुख्य सूत्रधार त्यांच्याकडे गेल्या चार ते पाच वर्षांपासून हमालीचे काम करणारा कामगारच असल्याचे समोर आले. मागील काही दिवसांपासून तो एका नवीन अज्ञात व्यक्तीला सोबत घेऊन येत होता. सोमवारी सकाळी त्याने आणखी एका साथीदाराला सोबत आणले आणि तिघांनी मिळून दरोडा घातल्याचे विजयकुमार गुप्ता यांनी सांगितले. या प्रकरणी रामदास पेठ पोलीस कसून तपास करीत आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांपुढे राहणार आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

व्यापाऱ्याला बांधून रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी सखोल तपास केला जात आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके विविध भागात रवाना करण्यात आली आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी दिली.