अकोला : धगधगत्या आगीमध्ये दोन चारचाकी वाहने भस्मसात झाल्याची धक्कादायक घटना शहरातील वाशीम बायपास मार्गावर एका गॅरेजसमोर सोमवारी सकाळी घडली. वीज रोहित्राच्या खाली ही वाहने उभे होते. त्याला अचानक आग लागली आणि क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केले. सामाजिक कार्यकर्ते व परिसरातील नागरिकांनी परिसरातील इतर वाहनांना बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. वीज यंत्रणेखाली वाहन उभे करणे धोकादायक ठरू शकते. त्याचा प्रत्यय आज अकोल्यात आला.
नेमकं घडलं काय?
शहरातील वाशीम बायपास मार्गावरील बुद्ध नगरीच्या बाजूला समीर गॅरेज आहे. या गॅरेज समोर विद्युत रोहित्राखाली चारचाकी वाहन उभे होते. त्या चारचाकी वाहनाला सकाळी ६:४५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग झपाट्याने पसरत गेली. बाजूलाच उभ्या दुसऱ्या दुसऱ्या वाहनाने देखील पेट घेतला. विद्युत रोहित्रांना आग लागून तारा देखील जळू लागल्या. या ठिकाणी अनेक चारचाकी वाहने उभे होते. त्या वाहनांच्या काचा फोडून नागरिकांच्या मदतीने ती ढकलत बाजूला करण्यात आली. यावेळी घटनास्थळावर मोठी गर्दी उसळली होती.
सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी अग्निशमन विभाग व पोलिसांना घटनेची माहिती दिली. अग्निशमन विभागातील निखिल आपोतीकर, सचिन माहोरे, दिनेश वाघमारे, वाहन चालक धर्मकुमार वाकोडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनांना लागलेल्या आगीवर पाण्याचा मारा करून ती आटोक्यात आणली. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती. सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांच्या प्रसंगवधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
तप्त उन्हामुळे आगीच्या घटनांमध्ये वाढ
अकोला जिल्ह्याला दरवर्षी उन्हाळ्यात तप्त उन्हाचे चटके सहन करावे लागतात. उन्हाळ्यात तापमानात कमालीची वाढ होते. जिल्ह्यात दरवर्षी तापमानाचे विक्रम रचले जातात. देशातच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून अकोला पुढे आले आहे. या उन्हाळ्यात देखील अकोला जागतिक पातळीवर सर्वाधिक उष्ण शहर ठरले. तापमानाचा चढता आलेख कायमच आहे. दुपारच्या सुमारास घराच्या बाहेर पडणे कठीण होते. अंगाची लाहीलाही होत असून घामाच्या धारा लागत आहेत. जिल्ह्यात वाढलेल्या तापमानाचा फटका आता वाहनांना बसण्यास सुरुवात झाली. आगीच्या भक्ष्यस्थानी वाहने सापडत आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेता आता वाहनांची देखील विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तापमानामुळे आगीच्या घटना सातत्याने वाढत आहेत.
