अकोला : जिल्ह्यातील चिखलगाव येथील दोन मुलांचा बोरमळी चेलगाव येथील धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज, ७ जून रोजी घडली. २० फूट खोल अडकलेला मृतदेह संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढला. योगेश आश्रुबा डाहाळे आणि कार्तिक कृष्णा डाहाळे ( वय अं.१८ वर्ष, दोघेही रा. चिखलगाव ता. जि. अकोला) अशी मृत मुलांची नावे आहेत.
अकोला जिल्ह्यातील चिखगाव येथील दोन मुले बोरमळी चेलगाव येथील धरणात गेले होते. धरणातील पाण्याचा अंदाज आला नसल्याने दोन्ही मुले खोल पाण्यात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. बोरमळी चेलगाव येथील धरणात दोन मुले बुडाल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांसह प्रशासनाला दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बचाव कार्य राबविण्यासाठी तहसीलदार राजेश वझिरे आणि पुनोती येथील राजू पाटील यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनद्वारे संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाला घटनेची माहिती दिली.
शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे, त्यांचे सहकारी मयुर सळेदार, शेखर केवट, अंकुश सदाफळे, विष्णु केवट, किशोर तायडे, शिवम वानखडे, सार्थक वानखडे आदींचे पथक साहित्यासह घटनास्थळावर अवघ्या काही मिनिटांमध्ये दाखल झाले. धरण्यात मुले बुडालेल्या ठिकाणी तत्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोध व बचाव पथकाने खोल पाण्यात मुलांचा शोध घेतला. त्यावेळी २० फूट खोल पाण्यात तळाशी मृतदेह अडकून पडल्याचे दिसून आले. पथकातील सदस्यांनी अथक प्रयत्नातून २० फूट खोल अडकलेला मृतदेह बाहेर काढला, असे दीपक सदाफळे यांनी सांगितले.
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले. यावेळी घटनास्थळावर बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे ठाणेदार धुमाळ यांच्यासह सुशांत आठवले, बोरमळीचे सरपंच, नातेवाईक, पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे घटनेवर लक्ष ठेऊन होते. या घटनेमुळे चिखलगाव परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उन्हाचा पारा चढत असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी अनेक जण पोहण्याचा मार्ग निवडतात. मात्र, खोल पाण्याच्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा या प्रकारे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.