अकोला : प्रशिक्षकाकडून १४ वर्षीय शालेय कुस्तीपटूची विवस्त्र चित्रफीत काढून ती समाज माध्यमातून प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात घडला आहे.आंतरशालेय कुस्ती स्पर्धेदरम्यान वजनाची मोजमाप करतांना पोलीस सभागृहातच हा खळबळजनक प्रकार घडला. या प्रकरणी कुस्तीपटूच्या वडिलांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला आहे. क्रीडा क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील नीमवाडी येथील पोलीस सभागृह येथे ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आंतरशालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक शाळेतील कुस्तीपटू सहभागी झाले. अनेक प्रशिक्षक सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुस्तीपटूंना नियमानुसार वजन करावे लागते. स्पर्धेत सहभागी एक १४ वर्षीय कुस्तीपटू वजन करण्यासाठी आला. यावेळी त्याचे वजन २०० ग्रॅम अधिक भरले. त्यामुळे वारंवार त्याचे वजन केल्या जात होते. यावेळी त्याने अंगातील कपडे देखील काढून ठेवले. कुस्तीपटू विवस्त्र होऊन वजन करीत असतांना त्या अवस्थेत मोबाइलद्वारे प्रशिक्षक कुणाल माधवे याने चित्रीकरण केले.

प्रशिक्षक माधवे तेवढ्यावरच थांबता नाही, तर त्याने कुस्तीपटूला अश्लील शिवीगाळ केली. विवस्त्र चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी सुद्धा दिली. काही काळातच त्याने चित्रफित व छायाचित्र हे समाज माध्यमातून प्रसारित सुद्धा केले. त्यामुळे १४ वर्षीय कुस्तीपटू विद्यार्थ्याची बदनामी झाली असून तो प्रचंड मानसिक दबावाखाली आला आहे. या प्रकरणी कुस्तीपटू विद्यार्थ्याच्या वडिलांनी खदान पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

घडलेला संपूर्ण प्रकार कुस्ती संघटनेचे पदाधिकारी यांना सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी प्रशिक्षक कुणाल माधवे याच्याविरुद्ध बीएनएस २९६, ३५१ (२), माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६७ (बी) नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचा मोबाइल देखील जप्त केला आहे. पुढील तपास खदान पोलीस करीत आहेत.

समाज माध्यमाचा काळजीपूर्वक वापर करावा

समाज माध्यमांचा वापर हा काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. त्याचा गैरवापर करणाऱ्यांवर मोठी पोलीस कारवाई होते. याची दक्षता घ्यावी, असे आवाहन खदान पोलिसांनी केले आहे.