अकोला : गुढीपाडव्यापासून राम नवमी उत्सवाला प्रारंभ झाला. यावर्षी ऐन राम नवमी उत्सवात अन्नदान, जेवणावळीवर ‘संक्रांत’ आली आहे. गेल्या सुमारे १५ दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद असल्याने हॉटेल, केटरिंग व्यावसायिकांची ‘गॅस कोंडी’ झाली. गॅसशिवाय व्यवसाय करायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला. यावर केटरिंग व्यावसायिकांनी संबंधित ग्राहकांनाच गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले तरच आम्ही स्वयंपाकाची ‘ऑर्डर’ पूर्ण करू, अशी भूमिका घेतली. त्यामुळे यजमानांची चांगलीच कोंडी होत असून अन्नदान, जेवणावळीपासून बंद होण्याच्या मार्गावर आहे.
गॅस पुरवठा साखळी विस्कळीत
आखाती देशांतील युद्धामुळे जागतिक स्तरावर गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाली. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील गॅस पुरवठ्यावर झाला. गॅसचा मोठा तुडवडा निर्माण झाला. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला. परिणामी हॉटेल, केटरिंग व इतर खाद्यपदार्थ व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अकोला शहरात सुमारे ५०० हॉटेल, रेस्टॉरंट, स्वीट मार्ट, केटरर्स व्यावसायिक आहेत. गेल्या सुमारे १५ दिवसांपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे. हॉटेल व्यावसायिक काही दिवसांचा गॅसचा साठा करून ठेवतात. आता तो संपुष्टात आल्याने पुढे काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
गॅस कोंडी
अनेक हॉटेलला टाळे लागले. सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. लग्नकार्यासह विविध समारंभांमध्ये थाळीप्रमाणे केटरिंग व्यावसायिकांना ऑर्डर दिली जाते. पूर्वनियोजित समारंभ, कार्यक्रमांचे अगोदरपासूनच नियोजन असते. आता मात्र व्यावसायिक सिलिंडरअभावी गॅस कोंडी निर्माण झाली.
धार्मिक कार्यक्रमांनिमित्त अन्नदान व महाप्रसादावर प्रश्नचिन्ह
सध्या सर्वत्र राम नवमी उत्सव सुरू असून विविध धार्मिक कार्यक्रमांनिमित्त अन्नदान व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांसाठी केटरिंग किंवा आचाऱ्यांना स्वयंपाकाची ऑर्डर देण्यात येते. सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच उपलब्ध नसल्याने अन्न शिजवायचे कसे? असा मोठा प्रश्न आहे. त्यावर केटरिंग व्यावसायिकांनी एक मार्ग काढला आहे. त्यावर कॅटरिंग व्यावसायिकांनी एक मार्ग काढला आहे. संबंधित ग्राहकांनी सिलिंडरची व्यवस्था करून दिली तरच ऑर्डर पूर्ण करू, अशी भूमिका कॅटरिंग व्यावसायिक घेत आहेत. गॅस सिलिंडरची व्यवस्था होत नसल्यास ऑर्डर रद्द करण्यासह नवीन कुठलेही काम घेतले जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जेवणावळीचे कार्यक्रम जवळपास बंद झाले आहेत.
सार्वजनिक कार्यक्रमांसाठी घरगुती सिलिंडरचा वापर
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये स्वयंपाकासाठी केटरिंग व्यावसायिक संबंधित ग्राहकांनाच सिलिंडर आणण्यास सांगत आहेत. गरज भागवण्यासाठी अनेकांच्या घरचे घरगुती गॅस सिलिंडर जमा करून त्याचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.
