अकोला : अकोला महापालिकेच्या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काँग्रेस नगरसेवकांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवाजीही आमचेच, औरंगजेबही आमचेच होते, असे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान यांनी केले. शिवाजी महाराजांचे औरंगजेबाशी नाव जोडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराचा भाजपने निषेध केला.

नेमकं घडलं काय?

अकोला महापालिकेची सर्वसाधारण सभा आज सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेमध्ये अकोला शहरातील कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडी खरेदी करण्याच्या विषयावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान यांनी आपले मत मांडले. त्यांनी छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख औरंगाबाद असा केल्याच्या मुद्द्यावर भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यावर स्पष्टीकरण देताना आझाद खान यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

“औरंगाबाद व संभाजीनगरमध्ये फरक आहे का? एकच आहे”

घंटागाडी खरेदीच्या विषयावर बोलताना काँग्रेस नगरसेवक आझाद खान म्हणाले, “राज्यातील विविध महापालिकेमध्ये कचरा संकलनाचा कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराकडून वाहन खरेदी, त्याची देखभाल व दुरुस्ती केली जाते. औरंगाबाद महापालिकेत त्याच पद्धतीने १ मे रोजी ४७७ गाड्या घेतल्या आहेत. मग आपल्या महापालिकेत तसे का होत नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. छत्रपती संभाजीनगरऐवजी औरंगाबाद असा उल्लेख केल्याने भाजपा नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यावर ठिक आहे, संभाजीनगर, काही विषय आहे का? औरंगाबाद व संभाजीनगरमध्ये फरक आहे का? एकच आहे, असे आझाद खान म्हणाले.

“दोन्ही आमचेच आहेत”

शिवाजीही आमचेच व औरंगजेबही आमचेच होते. दोन्ही आमचेच होते. तो विषय काढण्याची काही गरज नाही, असे वक्तव्य नगरसेवक आझाद खान यांनी केले. भाजपने याचा निषेध केला. छत्रपती संभाजीनगर असाच उल्लेख करा, असेही भाजप नगरसेवक म्हणाले. काँग्रेस नगरसेवकांच्या वक्तव्यामुळे महापालिका सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणानंतर भाजप नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. दरम्यान, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले आहेत. वादग्रस्त वक्तव्यामुळे ही सभा चांगलीच गाजली. त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेऊन संताप व्यक्त केला जात आहे.