अकोला : पश्चिम वऱ्हाडातील खामगाव पाठोपाठ अकोल्यात सुद्धा काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर मदन भरगड यांनी काँग्रेसची साथ सोडली असून त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा पक्षाकडे सादर केला. ते १२ जूनला राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश घेणार आहेत. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. पक्ष नेतृत्व तिकीट वाटप व पदांवरील नियुक्त्यांमध्ये नेमके कुठले निकष ठेवतो, हे गेल्या ३० वर्षांमध्ये आपल्याला कळले नाही, अशी टीका मदन भरगड यांनी केली.
पश्चिम वऱ्हाडामध्ये काँग्रेस पक्षाला एका मागून एक धक्के बसत आहेत. खामगाव येथील माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. खामगावतील सानंदा समर्थक अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याने काँग्रेसला खिंडार पडले आहे. त्यानंतर आता अकोल्यात देखील काँग्रेसमधील नाराजी समोर आली. काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड यांनी पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केला. गेल्या ३० वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत होतो. त्यामुळे पक्षावर कुठलीही नाराजी नाही. मात्र, पक्ष नेतृत्व विविध निवडणुकांचे तिकीट वाटप करतांना व संघटनात्मक पदांवर नियुक्त्यांमध्ये नेमके कुठले निकष ठेवतो, हा प्रश्नच असल्याचा टोला भरगड यांनी लगावला.
राजीनामा दिल्यानंतर पक्षाच्या नेत्यांनी संपर्क साधून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता निश्चय झाला. काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा वरिष्ठांकडे विविध माध्यमातून सादर केला आहे. येत्या १२ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे मदन भरगड यांनी सांगितले.
मदन भरगड हे माजी महापौर आहेत. अनेक वर्ष ते काँग्रेसच्या महानगराध्यक्ष पदावरही होते. प्रदेशच्या विविध पदांवर त्यांनी कार्य केले. विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ते इच्छूक होते. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता. मात्र, नंतर पक्ष नेतृत्वाने समजूत काढल्यामुळे त्यांनी माघार घेतली. या अगोदर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. पराभवानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली होती. आता पुन्हा काँग्रेस सोडून ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश घेणार आहेत.