अकोला : १२ वर्षीय चिमुकलीचे सर्वस्व लुटून तिच्यावर जन्मदात्या नराधम पित्यानेच अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला होता. नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणात विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा २९ जानेवारीला सुनावली. सोबतच २५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला असून तो न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्याचा कारावास भोगाव लागणार आहे.
हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत २० नोव्हेंबर २०१७ रोजी नराधम पिता हिवरखेड येथे मुक्कामी होता. खोलीमध्ये आजोबा खाली जमिनीवर झोपलेले होते. आरोपी वडिलाने पाय दाबण्यासाठी मुलीला बोलावले. पीडिता आरोपीचे पाय दाबत असतांना त्याने पीडितेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. घडलेला सर्व प्रकार पीडितेने तिच्या आईला सांगितला. हे ऐकून आईच्या पायाखालची वाळूच सरकली. या प्रकरणी आरोपीला जाब विचारल्यावर त्याने मद्यप्राशन केल्याने वाद घातला. पीडित मुलीला घेऊन आईने थेट हिवरखेड पोलीस ठाण्यात धाव घेतली.
नराधम वडिलांविरोधात फिर्याद दाखल केली. हिवरखेड पोलीस ठाण्यात कलम ३७६ (२) एफ, एन भादंवि व सहकलम ०६ पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. या गुन्हयाचा तपास पो.उप.नि एस.एम. भस्मे यांनी करून दोषारोप न्यायालयात दाखल केले. एकूण १३ साक्षीदारांच्या साक्षी न्यायालयात नोंदविण्यात आल्या. साक्षी, पुरावे ग्राह्य धरून आरोप सिद्ध झाल्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा व २५ हजाराचा दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास सहा महिने अधिकचा सश्रम कारावास भोगावा लागेल. तसेच दंडाची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अजित देशमुख यांनी बाजू मांडली. अकोट न्यायालय येथे अंमलदार महिला पो. हवा ज्योती तेलगोटे यांनी पैरवी म्हणून कामकाज पाहिले. या प्रकरणी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेडडी, उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील, ठाणे प्रभारी गजानन राठोड यांनी प्रकरणाच्या तपासात योग्य मार्गदर्शन केले.
हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत नात्याला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या बहुचर्चित प्रकरणात आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा झाली. पीडितेला आज न्याय मिळाला आहे.

