अकोला : शीतपेयातून दारू पाजून १६ वर्षीय सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम बापाला न्यायालयाने दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा सुनावली. सोबतच ६५ हजारांचा दंडही ठोठावला. अकोट येथील जिल्हा व सत्र तथा विशेष न्यायाधीश बी. एम. पाटील यांनी हा निकाल दिला.
नेमकी घटना काय?
अकोट पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार आरोपीनेच दिली होती. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीने तीच्या आईसह पोलीस ठाणे गाठले. सावत्र वडिलांनी घरी वारंवार विनयभंग केला. अकोला येथे भाड्याच्या खोलीत शितपेयात दारू टाकून पाजली. त्यानंतर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी आरोपीवर कलम ३५४, ३७६ (२) (एफ), ५०६ सहकलम ५ (एन) (पी), ६ पोक्सो ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
१० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या
या प्रकरणातील आरोपी २१ जानेवारी २०२२ पासून अकोला कारागृहामध्ये बंदिस्त आहे. अकोट पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात एकूण १० साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. त्यातील अल्पवयीन पीडित मुलगी, तीची आई, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. सरकारी वकील ॲड.अजित देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
विविध कलमान्वये अशी सुनावली शिक्षा
न्यायालयाने कलम ३५४ प्रमाणे तीन वर्ष कठोर कारावासाची शिक्षा व १० हजार रुपये दंड, दंड न भल्यास एक महिना अतिरिक्त सश्रम कारावास, कलम ५०६ प्रमाणे एक वर्ष सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भल्यास १५ दिवसाची अतिरिक्त सश्रम कारावासची शिक्षा, कलम ३७६ (२) (एफ) व ३७६ (३) तसेच पोक्सो कायद्याचे कलम ५ (एन) पी.यु.एस ६, ५ (पी) पी.यु.एस ६ प्रमाणे आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा, ५० हजार रुपये दंड व दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम एकूण ६५ हजार आरोपीने भरल्यास पीडितेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. अजित देशमुख यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून प्रकाश जोशी व आश्विन नवघरे यांनी सहकार्य केले.
